

पुणे; पुढारी वृत्तसेवा : व्यंगचित्र ही भाषेच्या भिंती ओलांडून जाणारी कला आहे. शब्द न वापरता केवळ रेषेच्या माध्यमातून अतिशय समृद्ध कल्पना व्यंगचित्रकारांनी मांडल्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी केले. जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेतर्फे व कार्टुनिस्ट्स कंबाईन यांच्या सहकार्याने बालगंधर्व कलादालनात 'पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा'चे आयोजन केले आहे. महोत्सवाच्या दुसर्या दिवशी फडणीस यांनी प्रदर्शनाला भेट देऊन व्यंगचित्रे पाहिली.
त्यानंतर ते बोलत होते. कार्टुनिस्ट्स कंबाईनचे माजी अध्यक्ष चारुहास पंडित, प्रशांत कुलकर्णी, महोत्सवाचे आयोजक धनराज गरड उपस्थित होते. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या हस्ते फडणीस यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या कलाप्रवासातील ज्येष्ठ व्यंगचित्रकारांकडून मिळालेले मार्गदर्शन, अनुभवांविषयी बोलताना झळके यांना अश्रू अनावर झाले.
व्यंगचित्रकारांचा पहिला मेळावा 1980 साली केवळ 8 ते 10 व्यंगचित्रकारांच्या सहभागाने झाला. आज 100 पेक्षा अधिक व्यंगचित्रकार संघटनेच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. तरुणांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग किती चांगल्या पद्धतीने केला आहे हे या प्रदर्शनातील व्यंगचित्रे पाहिल्यानंतर ठळकपणे जाणवते आहे, असेही फडणीस म्हणाले.
माजी आमदार उल्हास पवार यांनी शनिवारी व्यंगचित्रे पाहिली. त्यांच्याशी कार्टुनिस्ट्स् कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी
संवाद साधला. रविवारी (दि. 7) सकाळी 11 पासून अतुल पुरंदरे, शरयू फरकंडे, मुकीम तांबोळी, विवेक प्रभू केळस्कर, उमेश कवळे हे अर्कचित्रांचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.