फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा : हडपसर-सासवड रस्ता विविध कारणांमुळे सध्या वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात सापडला आहे. या मार्गावर होणार्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, प्रवासी व नागरिक त्रस्त होत आहेत. वाहतूक पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सासवड मार्गावर गुरुवारी सायंकाळी वाहतूक कोंडी झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. फुरसुंगी येथील अरुंद असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर वाहन बंद पडल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती. फुरसुंगीकडे वळणार्या अवजड वाहनांमुळे या ठिकाणी सातत्याने वाहतुकीस अडथळा होत आहे.
मंतरवाडी चौक, रेल्वे उड्डाणपूल परिसर, पॉवर हाऊस, भेकराईनगर या ठिकाणी रस्त्याकडेला वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जात असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. मंतरवाडी चौक, भेकराईनगर, तुकाईदर्शन चौकात वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कात्रज बाह्यवळणमार्गे पुढे जाणारी वाहने मंतरवाडी चौकातून पुढे जातात. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचा वेग सातत्याने मंदावत आहे.
उरुळी देवाची फाटा, मंतरवाडी चौक, भेकराईनगर या परिसरात विविध ट्रान्सपोर्ट कंपन्यांची कार्यालये, कापड बाजार, हॉटेल असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अरुंद होत आहे. तसेच अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे उरुळी देवाची फाटा ते हडपसर हा प्रवास येथील वाहनचालक व प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्यापही येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
अरुंद रेल्वे उड्डाणपूल, पुलावरून फुरसुंगीकडे वळणारी वाहने, मंतरवाडी चौकातील वाहतूक कोंडी, उरुळी देवाची फाटा व पॉवर हाऊस या ठिकाणी रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त उभी करण्यात येणारी वाहने, रस्त्याची झालेली दुरवस्था, अतिक्रमणे, बेशिस्त वाहनचालक, वाहतूक पोलिसांचे होणारे दुर्लक्ष, या कारणांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.
हडपसर-सासवड रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पालखी सोहळ्यापुरते या रस्त्याकडे लक्ष दिले जाते. त्यानंतर मात्र प्रशासनाचे या मार्गाकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण कधी होणार व वाहतूक कोंडीतून आमची सुटका कधी होणार? हे प्रश्न अद्यापही कायम आहेत.
– अतुल हरपळे, नागरिक