

सासवड : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या सासवड (ता. पुरंदर) येथील बाह्यवळणावरील चंदन टेकडी आणि बोरावकेमळा या ठिकाणी मृत्यूचे सापळे (ब्लॅक स्पॉट) तयार झाले आहेत. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून परिसरातील नागरिक आणि प्रवासी उड्डाणपुलाची मागणी करीत आहेत.(Latest Pune News)
सासवड बाह्यवळण मार्ग हा अनेक गावांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, चंदन टेकडी आणि बोरावकेमळा येथील त्रिकोणी रस्ते तसेच इतर अपूर्ण कामांमुळे येथे सतत अपघात घडत आहेत. अपघातांचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या या दोन महत्त्वाच्या ठिकाणी उड्डाणपूल का बांधला नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या महामार्गावर काळेवाडी या ठिकाणी मृत्यूचा सापळा (ब्लॅक स्पॉट) तयार झाला आहे. शुक्रवारी (दि. 31) सायंकाळी भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या एका महिलेला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
आशा संजय काळे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दिवे घाटापासून पुढे पालखी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम झाल्याने वाहनांचा वेग अधिक असतो. या रस्त्यावर तीन महिन्यांत हा दुसरा अपघात आहे. अपघात रोखण्यासाठी नागरिकांकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
बाह्यवळणावरून जेजुरीहून सासवडकडे जाताना मुख्य महामार्गावरून काही मीटर अंतर उलट्या दिशेने नागरिक, विद्यार्थ्यांना धोकादायकपणे जावे लागते. चंदन टेकडी आणि बोरावकेमळा यांसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू झाल्यास या अपघातांवर नियंत्रण मिळवता येईल.
सचिन राऊत, नागरिक
राष्ट्रीय महामार्ग 965 बाबत आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत पालखी महामार्गावरील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत काही महिन्यांपूर्वी सासवड येथे बैठक झाली होती. या वेळी नागरिकांनी हा प्रश्न उपस्थित केला असता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून एका महिन्यात पर्यायी व्यवस्था करू, असे सांगितले होते. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.