

जेजुरी : पुणे येथे पार पडलेल्या ‘पुणे ग्रँड टूर 2026’च्या उद्घाटन समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारतीय राज्यघटनेची हस्तलिखित आणि चित्रमय प्रत भेट देण्यात आली. या प्रतीत प्रभू श्रीराम, श्री हनुमान, अर्जुन-श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिमालय, वाळवंट, समुद्रकिनारा अशा विविध भारतीय सांस्कृतिक प्रतीकांची कलात्मक चित्रे रेखाटण्यात आली आहेत.(Latest Pune News)
ही प्रत श्री मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर आणि ॲड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. संस्थानच्या वतीने श्री मार्तंड भैरव मंदिराचे हाताने रेखाटलेले देखणे चित्रही भेट देण्यात आले.
या वेळी श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले. त्यापैकी 51 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्त करण्यात आला असून, उर्वरित 60 लाख रुपये विविध गावे दत्तक घेऊन सेवा कार्यासाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. खेडेकर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी संस्थानच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत विश्वस्त मंडळाच्या संवेदनशील कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या वेळी केंद्रीयमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार अमित गोरखे, सिद्धार्थ शिरोळे, विश्वस्त राजेंद्र खेडेकर, पांडुरंग थोरवे, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, स्थापत्यतज्ज्ञ तेजस्विनी आफळे, जेजुरी पोलिस ठाण्याचे दीपक वाघचौरे, क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुकुंदे, भाजप नेते श्रीनाथ भीमाले, आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, अभयराजे शिरोळे यांच्यासह भारतीय सायकल फेडरेशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.