पुणे : ससून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग वार्‍यावर ; ऑनलाईन सिस्टिम नाही, स्वच्छतागृहांनाही कुलूप

पुणे : ससून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग वार्‍यावर ; ऑनलाईन सिस्टिम नाही, स्वच्छतागृहांनाही कुलूप
Published on
Updated on

प्रज्ञा केळकर-सिंग : 

पुणे : रक्त आणि मूत्रतपासणीसाठी असलेल्या विभागासमोर स्वच्छतागृहाचा अभाव, केसपेपर व रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी आदी माहितीसाठी ऑनलाइन प्रणाली नसणे, बाह्यरुग्ण विभागात कागदाच्या तुकड्यांवर लागलेल्या सूचना, अशा अनेक त्रुटींमुळे ससून रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाइकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे, प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात केलेले असताना अत्यावश्यक सुविधांची मात्र वानवा दिसून येत आहे.

ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दररोज दीड ते दोन हजार रुग्ण उपचारांसाठी येतात. आंतररुग्ण विभागात (आयपीडी) एक ते दीड हजार रुग्ण असतात. रुग्ण आणि नातेवाइकांची ससून रुग्णालयाच्या परिसरात कायम वर्दळ पाहायला मिळते. मात्र, वैद्यकीय तपासण्या, पायाभूत सुविधा, बाह्यरुग्ण विभागाची रचना, यामध्ये समन्वय नसल्यामुळे रुग्णालयात कायम गोंधळ उडालेला पाहायला मिळतो.

ओपीडीमध्ये केसपेपरच्या खिडक्या, औषधांच्या खिडक्या, अशा सर्व ठिकाणी कागदाच्या तुकड्यांवर 'फक्त महिलांसाठी', 'फक्त पुरुषांसाठी', 'गरोदर महिलांसाठी' अशा सूचना लिहिलेल्या दिसून येत आहेत. राज्यातील महत्त्वाचे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात चांगल्या दर्जाचे बोर्ड नसण्याबद्दल रुग्ण आणि नातेवाइकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांकडून तपासण्यांची नावेही कागदाच्या चिटोर्‍यावर लिहून दिली जात आहेत.

ऑनलाइन प्रणाली नसल्याने वेळखाऊ काम
राज्य शासनातर्फे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये एचएमआयएस प्रणाली कार्यान्वित होती. रुग्णांचे तपशील, तपासण्या, उपचार, वैद्यकीय पार्श्वभूमी ऑनलाइन सिस्टिमद्वारे जतन करण्यात आली होती. पाच महिन्यांपूर्वी ही प्रणाली अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे येथील काम वेळखाऊ झाले आहे.

ससूनमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या करण्यासाठी 56 क्रमांकाच्या विभागात पाठविले. तेथे रक्त आणि मूत्रसंकलन करायचे होते. तिथे स्वच्छतागृह नसल्याने बाहेरील बाजूला असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा पैसे देऊन वापर करावा लागला. त्यानंतर तपासणीचा अहवाल कागदाच्या छोट्या कागदावर लिहून देण्यात आला. त्यामुळे रिपोर्ट नेमका काय आहे? हे कळत नव्हते. एका शब्दात काहीतरी रखडण्यात आले होते. रिपोर्ट मिळविण्यासाठी चार ठिकाणी फिरावे लागल्याने मनस्ताप झाला.
                                                                                     – सलमा सय्यद, रुग्ण

मूत्रसंकलनासाठी जावे लागते सशुल्क स्वच्छतागृहात
बाह्यरुग्ण विभागाच्या उजव्या बाजूला विभाग क्र. 56 मध्ये रक्त आणि लघवी तपासणीची सोय करण्यात आली आहे. संबंधित विभागामध्ये नमुना आणण्यासाठी छोटा कंटेनर दिला जातो. लघवीचा नमुना आणण्यासाठी विभागाजवळच स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे. मात्र, ओपीडीच्या आवारातील स्वच्छतागृह कधी बंद असते, तर कधी तेथील अस्वच्छता सहन होण्यापलीकडची असते. स्वच्छतागृह उघडे असेलच तर पुरुष आणि महिला दोघांनाही तिथे जावे लागते. स्वच्छतागृह बंद असल्यास ओपीडीसमोरील मेडिकल स्टोअरच्या बाजूला असलेल्या सशुल्क स्वच्छतागृहात जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news