पुणे : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासकामांसाठी ग्रामपंचायतपातळीवर निधी उपलब्ध होत आहे, त्यामुळे गावची विकासकामे करताना सरपंचांनी सामान्य, गरीब माणसांच्या चेहर्यावर आनंद व समाधान आणणारी कामे करण्यास प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. आमदार आणि मंत्र्यांपेक्षाही सरपंच अनेक कामे करू शकतात. त्यासाठी अधिक जागरूक राहून सरपंचांनी काम केल्यास ते दीर्घकाळ सर्वांच्या लक्षात राहते, असेही ते म्हणाले.
दै. ‘पुढारी’च्या वतीने कार्यक्षम व निःस्पृहपणे समाजसेवा करणार्या पुणे आणि सातारा जिल्ह्यातील सरपंचांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पंचतारांकित हॉटेल लेमन ट्री येथे बुधवारी (दि. 7) दुपारी पार पडला. या कार्यक्रमात भरणे यांच्या हस्ते पुणे आणि सातारा जिल्ह्यातील सरपंचांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज दूध) अध्यक्ष अॅड. स्वप्निल ढमढेरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राज्य दूध उत्पादक प्रक्रिया व व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के हेसुद्धा उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर दै. ‘पुढारी’चे पुणे विभागीय सरव्यवस्थापक सुनील लोंढे, पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी, सहयोगी संपादक सुहास जगताप, सातारा आवृत्तीचे निवासी संपादक हरिश पाटणे, सातारा आवृत्तीचे ब्युरो चीफ जीवनधर चव्हाण, जाहिरात विभाग पुणे युनिट हेड संतोष धुमाळ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रायोजक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज दूध) होते.
भरणे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये खूप चांगले काम करणार्या लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम दै. ‘पुढारी’कडून नेहमीच होते. तशा बातम्याही आपण वाचतो. त्याचप्रमाणे चुकलेल्या लोकांना वठणीवर आणण्याचे कामही त्याच पद्धतीने केले जाते. सरपंचांवर प्रशासकीय आणि राजकीय जबाबदारीही आहे. शिवाय ग्रामसभेचीही जबाबदारी सांभाळावी लागते. गावात चांगले काम होण्यासाठी सरपंच झटतात. पण, हे काम करताना त्रास हा होतोच, ज्या झाडाला फळे आहेत, त्यालाच लोक दगड मारतात, हे लक्षात ठेवा. जे सरपंचाच्या वाट्याला येते, ते आमच्याही वाट्याला येते, असे भरणे यांनी म्हणताच सभागृहात टाळ्या पडल्या.
सरपंचाची जबाबदारी ही गावात सर्वच बाबतीत येते. जन्म झाला की दाखला मिळवून देणे, अंगणवाडी उत्तम असण्यासाठी प्रयत्न करणे, त्यानंतर जिल्हा परिषदेची शाळा चांगली ठेवणे, नागरिकांच्या उत्तम आरोग्यास प्राधान्य देणे आणि जीवनाच्या शेवटी स्मशानभूमीतही अंत्यविधीची व्यवस्था नीट ठेवणे आदी सर्वच जबाबदार्या सरपंचांना सांभाळाव्या लागतात.
सुमारे 50 ते 100 कोटींची कामे करण्यापेक्षा झोपडीत राहणार्या गरजू माणसास घरकुल मिळवून देण्यात खरा आनंद आहे. त्या माणसाच्या चेहर्यावरील आनंद समाधान देणारा राहतो. त्यामुळे योजनांचा लाभ खर्या गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी सरपंचाची भूमिका महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार करून भरणे म्हणाले की, चांगले काम केल्यामुळे दै. ‘पुढारी’कडून सन्मानरूपाने तुमच्यावर शाबासकीची थाप पडली आहे. यामुळे तुमची जबाबदारी आणखी वाढली आहे. भविष्यातही गावासाठी चांगल्या योजना राबवा, जेणेकरून विकासकामांसाठी संबंधित गावाचे नाव कायम घेतले जाईल. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले. हरिश पाटणे यांनी आभार मानले.
मी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सामान्य शेतकरी आहे. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली. साखर कारखाना संचालक, कारखाना अध्यक्ष, जिल्हा बँक अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, जि. प. अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री म्हणून काम करीत आहे. मात्र, गरीब माणसाच्या चेहर्यावर आनंद देण्याचे काम केल्याचे समाधान मला पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या काळात मिळाल्याची आठवण भरणे यांनी या वेळी आवर्जून सांगितली.
राष्ट्राच्या विकासात ग्रामविकास हा पाया आहे. गावविकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची आहे. त्या सरपंचांच्या कारकिर्दीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा दै. ‘पुढारी’च्या वतीने होत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागाच्या समस्या मांडणे आणि प्रगतीसाठी सामाजिक भूमिका घेऊन दै. ‘पुढारी’ ग्रामविकासात सदैव महत्त्वपूर्ण योगदान देत आल्याची माहिती पुणे आवृत्तीचे सहयोगी संपादक सुहास जगताप यांनी प्रास्ताविकात दिली. दै. ‘पुढारी’चे संस्थापक पद्मश्री डॉ. कै. ग. गो. जाधव यांनी त्यासाठी व्यापक काम केले. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. ग्रामीण भागातील प्रश्न सोडवणुकीसाठी ‘पुढारी वृत्तपत्रसमूह’ धडाडीने काम करीत असून, सरपंचांच्या कारकिर्दीचे कौतुक व्हावे, यानिमित्ताने हा कार्यक्रम अयोजित केल्याचे ते म्हणाले.