

पुणे; पुढारी वृत्तसेवा: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) उच्च शिक्षणासाठी पन्नास हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. 'सारथी'च्या वतीने 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.
त्याद्वारे विद्यार्थ्यांना दोन टप्प्यामध्ये ही शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. योजनेअंतर्गंत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमासाठी लागणार्या पुस्तकांसाठी पंचवीस हजार रुपये आणि शैक्षणिक साहित्य तसेच, इतर शैक्षणिक खर्चासाठी पंचवीस हजार रुपये असे एकूण पन्नास हजार रुपये विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.
यासाठी राज्य बोर्डातून दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण असावी, बारावीच्या परीक्षेत किमान 55 टक्के गुण आवश्यक, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पदवीचे गुण तर पदवीच्या अभ्यास क्रमासाठी बारावीचे गुणांनुसार क्रमवारी, पदवीसाठी 25 तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 30 ची कमाल वयोमर्यादा, इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेणारा नसावा, या अटी असणार आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमयादा 25 वर्षे आणि पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे ठेवण्यात आली आहे.
या मुदतीमध्ये करा अर्ज…
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची मुदत – 21 नोव्हेंबर
कागदपत्रे हार्ड कॉपी संस्थेस पाठविण्याची शेवटची मुदत – 30 नोव्हेंबर
संकेतस्थळ – https://www.sarthi-maharashtragov.