

पुणे : ’कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोच्या अलीकडील भागात एका लहान मुलाने अतिआत्मविश्वासातून काही चुकीची उत्तरे दिली. परिणामी, तो स्पर्धेतून बाहेर पडला आणि एक रुपयाही जिंकू शकला नाही. सोशल मीडियावर मुलावर आणि त्याच्या पालकांवर टीकेची झोड उठली. मात्र, वस्तुस्थिती जाणून न घेता टीका करणे चुकीचे असून, मुलाला एडीएचएडी (अटेंशन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर) ही मानसिक स्थिती असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.(Latest Pune News)
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, एडीएचएडी डिसऑर्डरमध्ये मुलांना आपला उत्साह, लक्ष आणि भावना. यावर नियंत्रण ठेवण्यात अडचण येते. त्यामुळे ते अनेकदा अतिउत्साही, चंचल किंवा उतावीळ वागणुकीचे दिसतात. अशा वागणुकीचा अर्थ ’शिस्त नसणे’ असा न लावता त्यामागील वैद्यकीय कारण समजून घेणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. या घटनेनिमित्त सोशल मीडियावरील चर्चा पुन्हा एकदा ’बालसंवेदनशीलते’कडे वळली आहे. बालस्पर्धकांवरील सार्वजनिक टीकेपेक्षा त्यांना प्रोत्साहन आणि समजून घेण्याची गरज असल्याचे बाल मानसशास्त्रज्ञांनी नमूद केले.
योग्य निदान, सल्लामसलत, वर्तन-उपचार आणि काही प्रकरणांत औषधोपचार यामुळे मुलांना आत्मनियंत्रण आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. पालक, शिक्षक आणि समाजाने अशा मुलांकडे सहानुभूतीने पाहणे, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. सकारात्मकतेने मुलांना योग्य वाट दाखविणे, त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते.
कोणत्याही मानसोपचार स्थितीचे वर्णन केवळ एखाद्या प्रसंगावरून करता येत नाही. त्यामुळे मुलाला आणि पालकांना अशा पद्धतीने ट्रोल करणे बेजाबदारपणाचे लक्षण आहे. कोणाच्याही आयुष्यावर किंवा लहान मुलाच्या वर्तनाबाबत बोलताना अविचारीपणा करणे अयोग्य आहे.
डॉ. भूषण शुक्ला, बालमानसोपचारतज्ज्ञ
एडीएचएडी हा न्यूरो-डेव्हलपमेंटल डिसऑर्डर अर्थात मेंदूच्या विकासाशी संबंधित विकार आहे. या विकारात मुलांना लक्ष केंद्रित ठेवणे, शांत बसणे आणि आपले आवेग नियंत्रित करणे कठीण जाते.
एडीएचएडी हा न्यूरो-डेव्हलपमेंटल डिसऑर्डर अर्थात मेंदूच्या विकासाशी संबंधित विकार आहे. या विकारात मुलांना लक्ष केंद्रित ठेवणे, शांत बसणे आणि आपले आवेग नियंत्रित करणे कठीण जाते.