इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. निमगाव केतकी ते इंदापूर या बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये सोनमाथा व वेताळ मंदिर या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. सोनमाथा या ठिकाणी निमगाव केतकीकडून इंदापूरकडे येताना चढ आहे. त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास होत आहे.
रस्त्यावरील डांबर उखडल्याने धुळीचा त्रास होत आहे. यासाठी उपाययोजना म्हणून पाणी मारणे आवश्यक असले तरी जादा पाणी मारून रस्त्यावर चिखल केला जातो. काहीवेळा पाणीच मारले जात नाही. धुळीने वाहनचालक व प्रवाशांना त्रास होत आहे. टँकरद्वारे रस्त्यावर पाणी मारले जाते. ते अनेकदा खड्ड्यांमध्ये साचते. त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत.
निसरड्या रस्त्यामुळे मोटार देखील घसरत आहेत. वेताळ मंदिर (तरंगवाडी) या ठिकाणी ओढा आहे. या ठिकाणी अद्याप पूल बांधण्यात आलेला नाही. दोन महिन्यांवर पावसाळा आला असतानाही पुलासाठी काहीच हालचाली झालेल्या नाहीत. जर या ठिकाणी पूल
बांधला गेला नाही, तर रस्त्याच्या एका बाजूला तळे साचणार आहे. त्यामुळे पूल बांधणे गरजेचे आहे.