पुण्यातील सांगरुण आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर!

पुण्यातील सांगरुण आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर!
Published on
Updated on
वारजे(पुणे) : हवेली तालुक्यातील खडकवासला-बहुली रस्त्यावरील सांगरुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सध्या विविध समस्यांनी घेरले आहे. या दवाखान्याच्या छताची दुरवस्था झाली आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हे केंद्र 'सलाईन'वर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सांगरुण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताची (स्लॅबची) दुरवस्था झाल्याने त्यातून पावसाच्या पाण्याची गळती होत आहे. यामुळे रुग्णांसह कर्मचार्‍यांचे हाल होत आहेत. या छताची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मनसेचे विजय इंगळे म्हणाले, की पावसाचे पाणी आरोग्य केंद्राच्या छतातून व भिंतीमधून जागोजागी टिपकत आहे. यामुळे डॉक्टरांना रुग्ण तपासण्यासाठीदेखील जागा शिल्लक नाही. ज्या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यात येतात, तो हॉलदेखील गळत आहे. सततच्या गळतीमुळे छताची प्लास्टर पडले असून, भिंतींची दुरवस्था झाली आहे.
या आरोग्य केंद्रात दररोज सत्तरहून अधिक रुग्ण आरोग्यसेवेचा लाभ घेत आहेत. 1994 साली या दवाखान्याचे बांधकाम झाले आहे. मात्र, प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने हे बांधकाम जीर्ण झाल्यामुळे पावसाच्या पाण्याची गळती होत आहे. गळती थांबवण्यासाठी दवाखान्याच्या छतावर स्वखर्चातून ताडपत्री टाकली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अधिकारी, कर्मचार्‍यांची कमतरता

शिवणे ते बहुली परिसरातील गावांमधील सुमारे 68 हजार नागरिकांसाठी जिल्हा परिषदेचे सांगरुण प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या अंतर्गत शिवणे, उत्तमनगर, बहुली व आगळंबे येथील उपकेंद्र आहेत. या सांगरुण आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांची कमतरता असून, जवळपास 50 टक्के पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
आरोग्य केंद्रातील गळतीमुळे पावसाचे पाणी भिंतीत उतरल्याने काहींना विजेचा शॉक बसण्याचा प्रकारदेखील घडला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या दवाखान्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
-विजय इंगळे, कार्यकर्ते, मनसे
पाणीगळतीबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. शाखा अभियंत्यांनी या दवाखान्याची पाहणी करून इस्टिमेटचा अहवाल बांधकाम विभागास दिला आहे.
-महेश वाघमारे, विस्तार अधिकारी, हवेली पंचायत समिती
आरोग्य केंद्राच्या गळतीचे इस्टिमेट जिल्हा परिषदेच्या विभागीय कार्यालयास सादर केले आहे. दुरुस्तीच्या कामास मंजुरी मिळाल्यानंतर निविदाप्रक्रिया तातडीने पूर्ण करून या कामास सुरुवात करण्यात येईल.
-विनायक जाधव, शाखा अभियंता, जिल्हा परिषद
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news