

Sangram Thopte criticism Shankar Mandekar
भोर: भाटघर, निरा देवघर, गुंजवणीमधील अतिरिक्त पाणी खाली जाते. अर्धवट सिंचनाचे प्रकल्प कोणामुळे रखडलेली, हे तुमच्या नेत्याला तुम्ही जाब विचारण्याची तुमच्यात धमक आहे का? तसेच संविधानाप्रमाणे मला अधिकार असून, लोकशाहीत त्याला वाचा फोडण्याचे काम केले जाते. याची विद्यमान आमदारांना कल्पना नसावी.
शेजारी एक राजू गाईड लिहून देत होता, दुसरा टेलिग्राम कानात सांगत होता. ते स्वत: काय बोलत होते, हे कळत नव्हते. तुम्ही तुमची पातळी राखा; अन्यथा आम्ही जशाच तसे उत्तर देऊ, अशी टीका माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्यावर केली. (Latest Pune News)
रायरेश्वर डोंगरी विकास परिषद येथे रविवारी (दि. 7) आमदार शंकर मांडेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस प्रत्युत्तर देताना माजी आमदार संग्राम थोपटे बोलत होते. या वेळी पोपट सुके, विकास कोंडे, विठ्ठल आवाळे, जीवन कोंडे, रवींद्र कंक, संतोष धावले, पल्लवी फडणीस, भाग्यश्री साठे, अतुल किंद्रे, रोहन बाठे, सचिन हर्णसकर, सुधीर खोपडे, उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, चंद्रकांत मळेकर, गणेश पवार, विजय शिरवले, माऊली पांगारकर, अमित सागळे, अभिषेक येलगुडे, नरेश चव्हाण, संतोष केळकर आदी उपस्थित होते.
थोपटे म्हणाले, माझ्यावर व्यक्तिदोषातून खोटे-नाटे आरोप केले जातात. मला जनतेचा कौल मान्य आहे. परंतु, त्यांचे प्रश्न सोडविण्यासही कटिबद्ध आहे. तुमचा विजय राजकीय अपघातातून आहे. सत्तेशिवाय कोण राहू शकत नाही, हे त्यांच्या नेत्यांना विचारा; मग त्यांना समजेल. सायकल स्पर्धा पंतप्रधान यांच्या सूचनेनुसार होणार आहे.
मात्र, स्थानिक आमदार लोकांची दिशाभूल करतात. मी मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार नियोजन करीत असून, विरोधकांना याची मिरची का झोंबली, हे समजत नाही. सहकारी संस्था मोडून कुणी खाल्ल्या? विद्यमान आमदारांची संस्थाच नाही, तर बाजूच्या लोकांनी डेअरी युनियन, कुक्कुटपालन संस्था या कोणी मोडून खाल्ल्या? राजगडचा कर्जपुरवठा रोखण्याचे काम कोणी केले? याचा विचार करा.
आता मुख्यमंत्री यांनी कर्जपुरवठा करून यांना चपराक दिली आहे. माझे प्रगतिपुस्तक पाहावे; मग आमदारांनी बोलावे. आंदोलनामुळे काम मंजूर झाल्यावर तुम्ही जाऊन उद्घाटन करता आणि आता ते माझ्यावरच श्रेय घेता, असा आरोप करतात.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रात्ररात्र फिरत आहात. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कितीवेळा पक्ष बदलला, हे कसे चालते? मुळशी गायरान जमिनी जागा ग्रामपंचायतीला मिळावी म्हणून पाठपुरावा केला. सदरचा प्रस्ताव शासनाकडे गेला असून, जिल्हाधिकार्यांना आदेश दिले आहेत. तुम्हाला जमले नाही म्हणून मी प्रयत्न केला, मग का झोंबतंय? पीएमआरडीचा आराखडा रद्द झाला आहे. कचरा प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केला. तुम्ही चांगल्याला चांगले म्हणाले पहिजे; मात्र तुमचा स्तर खाली गेला आहे, अशा शब्दांत थोपटे यांनी आमदार मांडेकरांवर प्रहार केले