

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर याचा निर्घृण खून केला. आयुष बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये उभा असताना अमन पठाण आणि यश पाटील या दोघांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये प्रवेश करताना हे दोघे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून, दोघांच्या हातात पिस्तुले असल्याचे दिसून येते. शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाना पेठ परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी पोलिसांनी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे या दोघांना अटक केली आहे. शनिवारी हे दोघे गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाकडे स्वतः हजर झाले आहेत, तर अद्याप अमन पठाण हा फरार आहे. आयुष याच्यावर तब्बल अकरा ते बारा गोळ्या झाडल्याचे घटनास्थळी पडलेल्या रिकाम्या काडतुसांवरून दिसून आले आहे. पोलिसांना तेथे बारा रिकामी काडतुसे तर एक अर्धवट काडतूस मिळून आले. (Latest Pune News)
याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले की, अमित पाटोळे, यश पाटील हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दोघांवर 2023 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. निखिल आखाडे याच्या खूनप्रकरणी हा गुन्हा समर्थ पोलिसांत दाखल आहे. त्या वेळी दोघेही अल्पवयीन होते, तर पठाण याच्यावर कोंढवा, समर्थ पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तसेच महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
आंदेकर टोळीला आयुष कोमकर याच्याबाबत माहिती होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. 05) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आयुष बाहेरून दुचाकीवरून आलेला दिसताच अमन आणि यश हे दोघे लक्ष्मी कॉम्प्लेक्स बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये शिरले. दोघांनी शर्टात लपवून ठेवलेली पिस्तुले काढली. त्यामध्ये मॅग्झिन लोड केले.
दोघे पार्किंगमध्ये पळत आले होते. आयुष समोर दिसताच दोघांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. दहा ते बारा राउंड दोघांनी फायर केले. त्यातील चार गोळ्या यशने फायर केल्याचे तो पोलिसांना सांगतो. गोळ्या लागल्याने आयुष जागेवर कोसळला, रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता. यानंतर यश आणि अमन या दोघांनी तेथून पळ काढला. त्याचवेळी रस्त्यावर अमित पाटोळे, सुजल मिरगू हे दोघे बाहेर वाट पाहत थांबले होते. तत्काळ यश आणि अमन या दोघांनी त्यांच्या दुचाकीवर बसून तेथून पळ काढला.
लहान भावासमोरच आयुषचा निर्घृण खून
आयुष त्याच्या लहान भावाला क्लासवरून नुकताच घेऊन आला होता. तो दुचाकी पार्क करून पार्किंगमध्ये उभा राहिला होता. तेवढ्यात पळत आलेल्या यश पाटील आणि अमन पठाण यांनी त्याच्यावर गोळीबार केला. हा प्रकार त्याच्या लहान भावासमोरच घडला.
चौघे रेकी, कटाच्या गुन्ह्यातील आरोपी
यश पाटील, अमन पठाण, अमित पाटोळे आणि सुजल मिरगू हे चौघे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या रेकी प्रकरणातील गुन्ह्यातील आरोपी आहेत. पोलिसांनी आंदेकर टोळीतील दत्ता काळे याला अटक केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. वनराज आंदेकर यांच्या खुनातील प्रमुख
आरोपींपैकी असलेले सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांची आंबेगाव पठार परिसरात घरे आहेत. कृष्णा आंदेकर याच्या सांगण्यानुसार दत्ता काळे याने ही रेकी करून त्याला माहिती दिली होती.