सांगवीत लम्पी स्किनच्या शिरकावाने घबराट; प्रशासनाने तातडीने लसीकरण करण्याची मागणी

सांगवीत लम्पी स्किनच्या शिरकावाने घबराट; प्रशासनाने तातडीने लसीकरण करण्याची मागणी
Published on
Updated on

सांगवी; पुढारी वृत्तसेवा: लम्पी स्किनचा शिरकाव झाल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. नामदेव सोनवणे यांनी सांगितले. हा संसर्गजन्य आजार असल्याने पशुपालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने लसीकरण सुरू करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात लम्पी स्किन या आजाराने थैमान घातले आहे.

बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील काही गावांतही या आजाराची जनावरे आढळली आहेत. आता बागायती पट्ट्यातील सांगवी परिसरात तावरे वस्ती येथे दत्तात्रय त्रिंबक तावरे यांच्या एका गाईला लम्पी स्किनचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. या आजारात जनावरांच्या त्वचेवर पुरळ येणे, जखमा होणे, एखादे जनावर दगावण्याची शक्यता असते, त्यामुळे पशुपालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

सांगवी भागात दोन दिवसांपूर्वी लम्पी स्किनचा प्रादुर्भाव दिसून येताच पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे. सांगवी परिसरातील पाच किलोमीटर अंतराच्या व्यासात 6 हजार 472 लहान मोठ्या जनावरांच्या नोंदी आहेत. सांगवीत-2 हजार 748,शिरवली-2 हजार 109, कांबळेश्वर-1 हजार 255 इतकी संख्या आहे. लम्पी स्किनचा प्रादुर्भाव दिसून येताच सर्व जनावरांना लसीकरणासाठी वरीष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविला आहे.

दोन,तीन दिवसांत लस उपलब्ध होणार असून सर्व जनावरांना गोठ्यांवर जाऊन लसीकरण करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी स्पष्ट केले. याबाबत महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बारामती तालुका पशुधन विकास विभागाची मागणी आली की लस उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तर तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. आर. पाटील यांनी लवकरच लस उपलब्ध झाल्यावर विविध पथके तयार करून सर्व जनावरांना लसीकरण करणार असल्याचे सांगितले.

सांगवी भागात गतवर्षी लम्पी स्किनच्या सुमारे तीन हजार जनावरांना लसीकरण केले आहे. त्यामुळे जनावरांना लम्पी स्किनची बाधा झाली नाही. तावरेवस्ती येथे या आजाराची सापडलेली गाय ही पंधरा दिवसांपूर्वी बाहेर गावाहून आणली असून या भागातील पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

                                                                  डॉ. नामदेव सोनवणे,
                                                              पशुधन विकास अधिकारी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news