सणस मैदान झाले अतिक्रमण मुक्त; अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंनाच प्रवेश

सणस मैदान झाले अतिक्रमण मुक्त; अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंनाच प्रवेश

हिरा सरवदे, पुढारी वृत्तसेवा : सारसबागेजवळील महापालिकेचे सणस मैदान अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला अखेर यश आले आहे. या मैदानावर केवळ अ‍ॅथलेटिक्समधील खेळांचा सराव करणार्‍यांना प्रवेश दिला जात असून पोलीस भरतीचा सराव करणार्‍यांसह मॉर्निंग वॉकला येणार्‍यांना बंदी घालण्यात आली आहे.

शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे अ‍ॅथलेटिक्स खेळाडू तयार व्हावेत, तसेच लहान मुलांमध्ये मैदानी खेळांविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने सारसबागेजवळ सणस मैदान विकसित केले आहे. या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिकचा ४०० मीटर लांबीचा ट्रॅक तयार केला आहे. या मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी चार ते सात या वेळेत लहान मोठे शेकडो खेळाडू प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळी फेक आदी खेळांचा सराव करतात.

खासगी अकॅडमींनी केले हाेते मैदानावर अतिक्रमण

कोविडच्या काळात इतर मैदानांसह सणस मैदानही बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाची पहिली, दुसरी आणि तिसरी लाट ओसरल्यानंतर हे मैदान पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे मैदानावर येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या थोडीसी कमी झाली होती. याचा फायदा घेवून पोलीस भरतीचे प्रशिक्षण देणार्‍या खासगी अकॅडमींनी मैदानावर अतिक्रमण केले. चौदा ते सोळा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 800 ते 900 युवक पोलीस भरतीचा सराव करत होते. याशिवाय या मैदानावर अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येत होते.

शासनाने निर्बंधांमध्ये शिथीलता देऊन शाळा, महाविद्यालये, मैदाने, उद्याने, क्रीडासंकुले सुरू केली आहेत. त्यामुळे सणस मैदानावर येणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले. मात्र, मैदानावर अतिक्रमण केलेल्यांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस भरतीचा सराव करणारे आणि मॉर्निंग वॉकवाले याच्यामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. परिणामी विद्यार्थी आणि पोलिस भरतीचा सराव करणारे यांच्यामध्ये धावताना अडथळा निर्माण होण्यावरून वाद होऊ लागले. वादाचे प्रमाण वाढल्याने प्रेरणा पालक संघ आणि युवा वॉरिअर्स यांनी महापालिकेतील पदाधिकारी व अधिकार्‍यांकडे मैदानावर अतिक्रमणाबाबत तक्रारी केल्या. याची दखल घेवून क्रीडा विभागाने खेळाडू आणि प्रशिक्षकांशिवाय इतरांना मैदानावर बंदी घातली आहे.

शाळा सुरू झाल्याने आम्हाला सकाळी सहा वाजता सराव करून शाळेत जावे लागते. मात्र, यावेळी पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणारे आम्हाला अडथळा ठरत होते. त्यातून वाद होत. मात्र, आता त्यांना बंद केल्याने आम्हा हवा तसा सराव करता येतो.

– पाथ्वी साळुंखे, खेळाडू विद्यार्थीनी

पोलीस भरतीचा सराव करणार्‍यांचा आणि मॉर्निंग वॉकला येणार्‍यांचा विद्यार्थ्यांना अडथळा होत हाेता. यासंदर्भात तक्रारी केल्यानंतर आता विद्यार्थींनांच प्रवेश दिला जातो. त्यामुळे वाद आणि अडथळे दूर झाले आहेत.

– राहुल शिंदे, अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक

पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्यानंतर अतिक्रमण करणार्‍यांना पायबंद घालण्यात आला आहे. मैदानावर प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या मासिक पाससाठी अर्ज स्विकारले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लवकरच सर्व प्रक्रीया ऑनलाईन करण्यात येणार आहे.

– संतोष वारुळे, उपायुक्त, क्रिडा विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news