

अनिल सावळे पाटील
जळोची (पुणे) : शुभप्रसंगी सनई-चौघडा हे मंगलवाद्य वाजविण्याची हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे. सनई-चौघड्याशिवाय शुभकार्य होतच नसे. परंतु, अलीकडील काळात डीजे, ऑर्केस्ट्राला अधिक पसंती दिली जात असल्याने सनईचे मंजूळ सूर हरवत चालले आहेत.आजकाल लग्नकार्यामध्येदेखील सनई-चौघडा वाजविला जात नाही. पूर्वापार चालत आलेली ही संस्कृती टिकविण्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. हेमाडपंथी मंदिर असो किंवा जागृत देवस्थान मंदिरे तिथे सनई-चौघडा वाजविण्याची प्रथा घडशी समाजाने अजूनही टिकून ठेवली आहे.
मुंबई,पुणे शहरांमध्ये सनई-चौघड्याला मागणी असताना ग्रामीण भागामध्ये मात्र दुर्लक्ष होत आहे. परिणामी, सनई-चौघडा वाजविणे, पारंपरिक कला जोपासणे, उत्तमरीत्या कलेचे शिक्षण घेणे सोडून काहींनी सनई-चौघडा बंद केला. आजही काही हाडाचे कलाकार जिवंत आहेत. ते हा वारसा उत्तमरीत्या सांभाळत आहेत. मात्र, काम मिळत नसल्याने या क्षेत्रातील कलाकारांना मिळेल ते काम करून उपजीविका करावी लागत आहे.
सनई-चौघड्यापेक्षा आज-काल तरुणांना जोरदार गाणी, डीजे सिस्टीम इतर वाद्य आवडतात. सनई-चौघडा ऐकणे म्हणजे कमीपणाचे लक्षण किंवा मागासलेपणाचे लक्षण असा समज होत आहे. सनई-चौघड्यापेक्षा तरुणांना ऑर्केस्ट्रा अधिक आवडतो. सनई-चौघड्यामध्ये जुनी भावगीते, भक्तिगीते ऐकवली जातात ही आजकालच्या तरुणांना आवडत नाहीत, हेदेखील ही कला लुप्त होण्यामागचे कारण आहे.
हा व्यवसाय बंद झाला तर हजारो लोकांचा रोजगार बुडणार आहे. त्यामुळे संस्कृती टिकवण्यासाठी सनई-चौघड्याला शुभकार्यात संधी देणे आवश्यक आहे.
मल्हार साळुंके, कोषाध्यक्ष, राज्य सनई-चौघडा संघटनादुर्मीळ होत चाललेली कला व कलाकार यांना जीवदान देण्यासाठी शासनाने मानधन चालू करावे. शासकीय कार्यक्रमात स्थानिक सनई-चौघडा कलाकारांना संधी देण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
किसन भोसले, उपाध्यक्ष, अखिल भारतीय घडशी समाज संघटना