

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले. काही वेळा हे प्रयत्न अपयशी ठरले, तर काही वेळा यश मिळाले. साम-दाम-दंड-भेद हे देवेंद्र फडणवीसांचेच शब्द आहेत. त्यांना काहीही करून सत्तेत यायचे असते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. या वेळी त्यांनी अजित पवार हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार असल्याचेही नमूद केले. खा. सुळे यांनी महापालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांतील प्रश्नांवर गुरुवारी महापालिका अधिकार्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, 'आमच्या पक्षाची भाजपशी युती किंवा आघाडी नाही. आमच्यापैकी काहींनी वेगळा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीत कोणतीही फूट झालेली नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही संभ—म नाही.'
अजित पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते
सुळे म्हणाल्या, 'अजित पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार आहेत. आत्ता त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्याची तक्रार आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या उत्तराची वाट पाहत आहोत.'
गुप्त बैठका केलेल्या नाहीत
शरद पवार आणि अतुल चोरडिया यांचे वडील एकत्र महाविद्यालयात होते. पवार आणि चोरडिया कुटुंबाची माझ्या आणि दादाच्या जन्माआधीपासून मैत्री आहे. त्यांच्या घरी जाण्यात कसली भीती?' आम्ही कुठल्याही गुप्त बैठका केलेल्या नाहीत, असेही सुळे म्हणाल्या.
पवार कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न
अजित पवार यांनी नागरिक म्हणून त्यांचा निर्णय घेतला. ते परत येतील की नाहे सांगू शकत नाही. पवार कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करू. कुटुंबात राजकारण येणार नाही, याची काळजी घेऊ, असेही खा. सुळे यांनी सांगितले.
राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
महाराष्ट्रातच या वर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले असून, काही भागात तर अद्याप पाऊस झालाच नाही. शेतकर्यांच्या हातचे पीक निघून गेले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांना तातडीने विम्याची रक्कम देण्याबरोबरच राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.