कोंढवा : साळुंखे विहार रस्ता सीमावादाच्या भोवर्‍यात!

कोंढवा : साळुंखे विहार रस्ता सीमावादाच्या भोवर्‍यात!
Published on
Updated on

सुरेश मोरे

कोंढवा(पुणे) : साळुंखे विहार रस्त्यावरील कचरा उचलण्यासह विविध कामांसंदर्भात वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय व हडपसर क्षेत्रीय कार्यालय एकमेकांकडे बोटे दाखवून हद्दीचा वाद निर्माण करीत आहेत, यामुळे परिसरातील नागरिकांसह व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्याही आता नित्याची झाली आहे. महापालिका प्रशासनासह वाहतूक पोलिसांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

साळुंखे विहार रस्ता हा वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत की, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत, हा आता कळीचा मुद्दा बनला आहे. दोन्ही कार्यालयांचे प्रशासन एकमेकांवर जबाबदारी झटकून मोकळे होत आहेत, यामुळे रस्त्याची व पदपथांची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच साफसफाई व कचरा उचलण्यावरूनदेखील कर्मचार्‍यांमध्ये हद्दीचा वाद उपस्थित केला जात आहे, यामुळे काही वेळेला कचरा परिससरात पडून राहत आहे.

पदपथांवर अतिक्रमणे झाली आहेत. 90 फूट रुंदीचा असलेला हा रस्ता आता अवघा 20 ते 25 फुटांचा झालेला आहे. मात्र, दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलिस या रस्त्यावर कधीही दिसत नाहीत. जगताप चौकापासून साळुंखे विहार रस्त्यापर्यंत असलेल्या चौकात वानवडी वाहतूक पोलिस दिसत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या संदर्भात वानवडी व हडपसर क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तसेच वानवडी वाहतूक विभागाच्या आधिकार्‍यांचा फोन देखील नॉट रिचेबल होता.

भाजी विक्रेत्यांतुळे वाहतूक कोंडीत भर

सीमाहद्दीच्या वादाबरोबरच या रस्त्यावर बसणार्‍या भाजीपाला विक्रत्यांचा प्रश्नही अद्याप कायम आहे. या ठिकाणी मोजकेच अधिकृत भाजीपाला विक्रेते आहेत. त्यांच्यासाठी नालागार्डनमध्ये मंडई उभारली आहे. तिथे या विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. मात्र, महापालिका प्रशासनाने त्यांना कोणत्याही सुविधा उपल्बध करून दिल्या नाहीत. परिणामी, विविध समस्यांमुळे हे विक्रते पुन्हा साळुंखे विहार रस्त्यावर व्यवसाय करू लागले आहेत. तसेच या ठिकाणी वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग केले जात असल्याने या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

साळुंखे विहार रस्त्याची दुरवस्था करण्यास महापालिकेसह पोलिसही जबाबदार आहेत. वेळीच कारवाई करण्याचे धाडस प्रशासनाने दाखविले असते, तर आज ही समस्या निर्माण झाली नसती.

                      – शशिकांत महिपाल, रहिवासी, साळुंखे विहार रस्ता परिसर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news