

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) रब्बी हंगामात शेतकर्यांना योजनेतून अनुदानावर बियाण्यांचा पुरवठा करण्याचे नियोजन केले असून त्यानुसार पुणे विभागात विक्रीही सुरू झाल्याची माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक लीलाधर मेश्राम यांनी दिली. रब्बी ज्वारीचे 6 हजार 699 क्विंटल, हरभरा 5 हजार 397 क्विंटल आणि गव्हाचे 1 हजार 813 क्विंटल मिळून एकूण 13 हजार 909 क्विंटलइतक्या बियाण्यांचा पुरवठा झाल्याचे ते म्हणाले.
रब्बी ज्वारी, हरभरा व गव्हाचे प्रमाणित बियाणे हे पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत शेतकर्यांसाठी अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाबीजच्या संबंधित जिल्ह्यातील विक्रेत्यांमार्फत कृषी विभागाकडून बियाणे परवाना (परमीट) किंवा साता बारा उतारा व आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेऊन अनुदानावर बियाण्यांची विक्री सुरू आहे. आत्तापर्यंत रब्बी ज्वारी, हरभरा व गव्हाच्या बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.
अन्नसुरक्षा अभियान, ग्राम बीजोत्पादनातून अनुदान
केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतून 5 एकर मर्यादेपर्यंत व ग्राम बीजोत्पादन योजनेकरिता 1 एकर मर्यादेपर्यंत 10 वर्षांच्या आतील नवीन वाणांचे व 10 वर्षांच्या वरील जुने वाणांचे बियाणे अनुदानावर उपलब्ध आहेत.
वाणाचे नांव व अनुदानित बियाणे विक्री दर पुढीलप्रमाणे.
रब्बी ज्वारी ः 10 वर्षांआतील वाण ः फुले रेवती 4 किलो 120 रुपये. रब्बी ज्वारी 10 वर्षांवरील वाण ः मालदांडी, फुले वसुधा – 4 किलो 148 रुपये. हरभरा ः 10 वर्षांआतील वाण ः राजविजय-202, फुले विक्रम, फुले विक्रांत, पिडीकेव्ही कांचन – 20 किलो 900 रुपये. हरभरा 10 वर्षावरील वाण ः दिग्विजय, विजय, जॅकी-9218 प्रत्येकी – 10 किलो 520, 20 किलो 1020, 30 किलो 1500 रुपये.
गहू ः 10 वर्षांचे आतील वाण ः फुले समाधान, एमएसीएस-6478, पिकेव्ही सरदार, डिबीडब्लू-168 – 20 किलो 500 रुपये. गहू 10 वर्षांवरील वाण ः लोक-1, जिडब्लू-496, एमएसीएस-6222, एचआय-1544, फुले नेत्रावती – 40 किलो 1080 रुपये याप्रमाणे दर आहे. तरी शेतकर्यांनी कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक अथवा महाबीज कार्यालय किंवा महाबीज बियाणे विक्रेत्यांकडे संपर्क साधून अनुदानावर उपलब्ध असलेल्या रब्बी ज्वारी, हरभरा आणि प्रमाणित गव्हाच्या बियाण्यांची खरेदी करण्याचे आवाहनही मेश्राम यांनी केले आहे.
विभागात 10 वर्षांचे आतील आणि 10 वर्षांच्या वरील बियाण्यांचा पुरवठा (क्विंटलमध्ये) पुढीलप्रमाणे.
जिल्हा ः रब्बी ज्वारी ः हरभरा ः गहू ः एकूण
पुणे ः 849 ः 1359 ः 833 ः 3041
सातारा ः 627 ः 1514 ः 470 ः 2611
सांगली ः 3364 ः 1664 ः 461 ः 5489
कोल्हापूर ः 1859 ः 860 ः 49 ः 2768
एकूण ः 6699 ः 5397 ः 1813 ः 13909