पुणे: सह्याद्री रुग्णालय समूहातील बहुतेक समभाग मणिपाल ग्रुपकडे हस्तांतरित झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक वादांना तोंड फुटले आहे. व्यवहारांमध्ये नियमभंग झाल्याच्या आरोप करण्यात आला असून, याबाबत महापालिकेला वकिलांकडून पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रातील आरोपांची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने सह्याद्री रुग्णालयाला नोटीस बजावली आहे.
वकील सुश्रुत कांबळे यांनी पाठवलेल्या पत्रानुसार, कोकण मित्रमंडळ मेडिकल ट्रस्टला जमीन पूर्वी गरजूंसाठी परवडणारी आरोग्यसेवा पुरवण्यासाठी देण्यात आली होती, नफा कमवण्यासाठी नाही. पण, सध्या हॉस्पिटलचे वर्तन हे एखाद्या कॉर्पोरेट संस्थेसारखे आहे. आम्हाला 24 तासांत उत्तर मिळाले नाही, तर आम्ही न्यायालयीन हस्तक्षेप मागणी करणार असल्याने पत्रात नमूद करण्यात आले आहे. (Latest Pune News)
रुग्णालय प्रशासन म्हणते...
सह्याद्री रुग्णालय प्रायव्हेट लिमिटेडमधील समभाग मणिपाल ग्रुपकडे हस्तांतरित होण्याचा रुग्णसेवा, व्यवस्थापन अथवा संस्थेच्या मूलभूत मूल्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. संस्थेचे मुख्य कायदेशीर व अनुपालन अधिकारी डॉ. अमितकुमार खातू यांनी म्हटले की, हा व्यवहार केवळ समभाग हस्तांतराचा आहे.
याआधीही अशा प्रकारचे हस्तांतर झाले असून, रुग्णालयांचे कामकाज सुरळीत सुरूच राहिले आहे. संस्थेची रचना आणि कायदेशीर जबाबदार्या पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. सह्याद्री ग्रुपकडून चालवल्या जाणार्या आठ रुग्णालयांपैकी केवळ डेक्कनमधील रुग्णालय हे ट्रस्टद्वारे चालवले जात असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
हे रुग्णालय 1998 मध्ये पुणे महापालिकेने 99 वर्षांच्या करारावर ट्रस्टला भाडेतत्त्वावर दिले होते. या कराराअंतर्गत संपूर्ण भाडे आणि प्रीमियम बाजारभावानुसार दिले गेले असून, सद्य:स्थितीत त्यावर चाललेली कोणतीही आर्थिक देवाणघेवाण नाही, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
महापालिकेशी झालेल्या करारानुसार, गरजू रुग्णांसाठी मोफत उपचारांची अंमलबजावणी केली जाते. दर वर्षी सुमारे 260 बेड डे (रुग्णदिवस) मोफत सेवा दिली जाते आणि आजवर एकाही शासकीय शिफारशीचे रुग्ण नाकारले गेलेले नाहीत. तसेच, आयपीएफ लाभदेखील पात्र रुग्णांना देण्यात येतो, असे स्पष्टीकरण पत्रकात दिले आहे.
वकिलांकडून घेण्यात आलेले आक्षेप
महापालिकेने कर्वे रस्त्यावरील 23,000 चौ.फुटांचा भूखंड कोकण मित्र मंडळ ट्रस्टला अत्यल्प भाड्यावर आरोग्यसेवा देण्यासाठी दिला होता. संबंधित जागा महापालिकेची स्पष्ट मंजुरी न घेता प्रथम एव्हरस्टोन कॅपिटल आणि त्यानंतर 2022 मध्ये ओंटारियो टीचर्स पेंशन प्लॅन (कॅनडा) यांना हस्तांतरित करण्यात आली. आता मणिपाल हॉस्पिटल्स समूह सुमारे 6,000 कोटींच्या व्यवहारात सह्याद्री हॉस्पिटल्स विकत घेत असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये कर्वे रस्त्यावरील रुग्णालयदेखील समाविष्ट आहे.
जानेवारी 2024 मध्ये राज्य आरोग्य विभागाने नर्सिंग होम कायदा, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, एमटीपी कायदा इत्यादीबाबत रुग्णालयाला कारणे दाखवा नोटिस बजावली होती. यामध्ये रुग्णांच्या तक्रारीसाठी अधिकारी नसणे, दरपत्रक न लावणे, जैववैद्यकीय कचर्यची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट यांचा समावेश होता.
महापालिकेने अतिरिक्त एफएसआयच्या मोबदल्यात 27 खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची अट घातली होती. मात्र, माहिती अधिकाराद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, या सेवा फक्त नावापुरत्याच पुरवल्या गेल्या.
पत्रातील मागण्या काय आहेत?
मणिपाल हॉस्पिटल्ससोबत झालेला हस्तांतर करार तत्काळ स्थगित करावा
सर्व हस्तांतराची चौकशी करावी व नियमभंग आढळल्यास जागा रद्द करावी
रुग्णालय सार्वजनिक हितासाठी वापरण्यात यावे
24 तासांत लेखी खुलासा द्यावा; अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात सार्वजनिक याचिका दाखल करण्यात येईल.
महापालिका आणि सह्याद्री हॉस्पिटमध्ये फ्री बेडबाबत झालेल्या कराराची प्रत मागवण्यात आली आहे. कराराचा सविस्तर अभ्यास करून त्यानंतर माननीय आयुक्तांच्या परवानगीने पुढील कारवाई केली जाईल.
- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका
आम्हाला एका वकिलाकडून पत्र प्राप्त झाले असून, त्यात या व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे आम्ही त्या पत्रासोबत नोटीस पाठवून या सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवले आहे.
- डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका