

खोर: ग्रामीण भागात दिवसेंदिवस व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत चालले आहे. गावोगावच्या किराणा दुकानदारांपासून पानटपर्यांपर्यंत गुटखा, तंबाखू, मद्य व इतर नशेची साधने सहज उपलब्ध असल्याने तरुणाई मोठ्या प्रमाणावर या दलदलीत ओढली जात आहे. शाळा, महाविद्यालयातील मुलांपासून ते शेतमजुरी करणार्या तरुणांपर्यंत व्यसनाची पकड झपाट्याने वाढत असून, त्याचे थेट दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी तरुण दिवसभर मजुरी करून संध्याकाळी दारूच्या आहारी जातात. व्यसनासाठी पैसे जमविण्यासाठी घरातील वस्तू विकणे, कर्ज काढणे किंवा महिलांना त्रास देणे असे प्रकार घडत आहेत. काही वेळा व्यसनामुळे होणार्या वादातून घरगुती हिंसाचार, घटस्फोट आणि आत्महत्या यांसारख्या घटना समोर येत आहेत. (Latest Pune News)
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात व्यसनाधिनतेचा प्रश्न फक्त वैयक्तिक नाही तर सामाजिक संकट बनला आहे. वेळेवर उपाययोजना न केल्यास भविष्यात संपूर्ण पिढी नशेच्या विळख्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच तरुण पिढीला या गर्तेतून बाहेर काढण्याची सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
महिलांवर मानसिक व आर्थिक अत्याचार
तरुणांच्या व्यसनाधिनतेचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो आहे. पतीची कमाई व्यसनात उडाल्याने घर चालवण्याची जबाबदारी महिलांवर येते. यामुळे त्यांना शेतमजुरी, हमाली करावी लागते. व्यसनातून होणार्या मारहाणीमुळे अनेक महिला न्यायालय, पोलिस ठाणे किंवा महिला मंडळाच्या दारात न्याय मागताना दिसतात.
प्रशासन व समाजाचा निष्काळजीपणा
गावात अवैध दारू विक्री, गुटख्याची खुलेआम दुकाने असूनही प्रशासनाचा कारवाई करण्याकडे उदासीनपणा आहे. दुसरीकडे पालक, शिक्षक व समाजातील जबाबदार मंडळी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे.
या उपाययोजना करण्याची गरज
गावोगावी व्यसनमुक्ती शिबिरे घेणे.
शाळा, महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम राबविणे.
महिलांसाठी समुपदेशन केंद्रे व स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे.
पोलिस व प्रशासनाने अवैध विक्रीवर धडक कारवाई करणे.