

दौंड: तालुक्याच्या दक्षिण भागातील खोर, देऊळगाव गाडा व पडवी परिसरात पशुपालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव या भागात वाढला आहे. त्यातच भाकड जनावरांची खरेदी-विक्री बंद असून भटक्या कुत्र्यांचे जनावरांवरील वाढते हल्ले यामुळे शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
परिसरातील अनेक जनावरांचे लसीकरण होऊनदेखील पुन्हा लम्पीची लक्षणे दिसत आहेत. ताप येणे, अंगावर गाठी उठणे, दूध उत्पादनात घट होणे, जनावरे भाकड होणे, अशक्तपणा येणे अशा समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत. (Latest Pune News)
जर्सी गायींच्या नर वासरांची (अंतुले) खरेदी-विक्री बंद असल्याने शेतकरी त्यांना डोंगर, ओढे, कालव्याच्या कडेवर सोडून देत आहेत. या वासरांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होत असून त्याच कुर्त्यांनी गोठ्यातील इतर पाळीव जनावरांवर देखील हल्ले सुरू केले आहेत.
लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने चांगल्या जनावरांची खरेदी-विक्रीही ठप्प झालीआहे. परिणामी दूध व्यवसायासह शेतीवरथेट परिणाम होऊन शेतकरी आर्थिक डबघाईला येत आहेत.
आजारी जनावरांवर उपचार सुरू आहेत. सर्वांचे लसीकरण झाले आहे. ग्रामपंचायतींना फवारणीच्या सूचना दिल्या आहेत; मात्र लसीकरणाचा परिणाम 21 दिवसांनी दिसतो. शेतकर्यांनी जनावरांची स्वच्छता, संपर्कावर नियंत्रण, बाहेरील जनावरांचे आगमन टाळणे यावर भर द्यावा. आजारी जनावरांची माहिती त्वरित पशुवैद्यकीय अधिकार्यांना द्यावी.
- डॉ. रवींद्र बांगर, पशुवैद्यकीय अधिकारी, देऊळगाव गाडा
माझ्या गायीला लम्पी झाल्यानंतर तिने दूध देणे बंद केले, तसेच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात माझे तीन मोठे बकरे दगावले. यातून मोठे आर्थिक नुकसान झाले. प्रशासनाने या परिस्थितीवर उपाययोजना करावी.
- रमेश जाचक, शेतकरी, देऊळगाव गाडा