इंदापूर तालुक्यातील विरोधी पक्षातील उमेदवाराने आजवर स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक राजकीय पक्षांत इकडून तिकडे प्रवास केला, मात्र ते ज्या-ज्या पक्षात गेले त्या-त्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याने जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.
इंदापूर येथे रविवारी (दि. 10) कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक अतुल व्यवहारे व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्या वेळी बोलताना चाकणकर म्हणाल्या, अतुलदादा आपण ज्या विश्वासाने पक्षात आला आहात त्याच विश्वासाने आपला सन्मान राखला जाईल.
महायुती सरकारच्या माध्यमातून इंदापूरला तब्बल 1 लाख 5 हजार महिलांच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा करण्यात आले. राजकारणाच्या इतिहासात प्रथमच महिलांना आर्थकि स्वावलंबी करण्यासाठी या सरकारने पाठबळ दिल्याचे सांगितले.
या वेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, अतुलजी तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची मला उणीव जाणवत होती. तुम्हाला येणार्या काळात पाहिजे ती मदत करण्याचा शब्द देतो. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, खर्याला खरे म्हणण्यासाठी वाघाचं काळीज लागत.
गेल्या 50 वर्षांत तुम्हाला जे जमलं नाही ते आ. भरणे यांनी अवघ्या 10 वर्षात करून दाखवलं. अतुल व्यवहारे म्हणाले, आमचे कुटुंब तीन पिढ्यांपासून पाटील यांच्यासोबत होते.आम्हाला त्यांनी अनेक पदांवर संधी दिली; मात्र आमच्या मागे असलेल्या नागरिकांची कोणतीही कामे झाली नाहीत.
मग आम्हाला पदे असून तरी काय उपयोग ? याउलट आ. भरणे यांच्या कामांचा झंझावात पाहून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, अक्षय शिंदे, अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, दीपक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी केले. कार्यक्रमास कर्मयोगाचे संचालक वसंत मोहोळकर, इंदापूर बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, कर्मयोगाचे माजी उपाध्यक्ष माऊली बनकर, बाळासाहेब व्यवहारे, गणेश झगडे, पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे, बाळासाहेब ढवळे, सागर व्यवहारे, कांतीलाल झगडे, अरविंद वाघ, पोपट शिंदे, अमर गाडे, राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
माझी नीतिमत्ता चांगली आहे
आमदार भरणे म्हणाले, मी सोलापूरचा पालकमंत्री असताना मोहोळ तालुक्यातील देवा गुंड पाटील हे हर्षवर्धन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्याकडे आले होते. त्यांना हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याच्या व्यवहारात फसवले होते; मात्र मी त्यांना स्पष्टपणे पोलीस अधीक्षकांना फोन करण्यास नकार दिला.