

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिंतूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात तिसराही स्पर्धक ताकदीने उतरल्याने महायुतीच्या उमेदवार व भाजपच्या आ. मेघना बोर्डीकर यांची मतविभाजन टाळण्यासाठी मोठी दमछाक होवू लागल्याचे चित्र आहे. मागील वेळी अल्पशा मताने काठावर विजयी होत विधानसभेत पोचलेल्या बोर्डीकरांना यावेळी मात्र अनेक आव्हानांना तोंड देण्याची वेळ आली आहे.
जितूर मतदारसंघात २००४ पासून बोर्डीकर विरूद्ध महाविकास आघाडीचे विजय भांबळे यांच्यातील लढती लक्षवेधक ठरलेल्या आहेत. या मतदारसंघात हे दोघे पारंपारीक राजकीय शत्रु म्हणून एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे काम करतात. सत्तेत असताना दोघेही आपापल्या पद्धतीने कामे करतात. मात्र या कामांचा परिणाम कार्यकर्ते दुरावण्यात होत असल्याचे दिसून येते.
याच अनुषंगाने आ.बोर्डीकर यांच्याही बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून सोबत राहिलेले कार्यकर्ते ऐन निवडणुकीच्या हंगामात दुसर्या पक्षात डेरेदाखल झालेले आहेत. त्यामुळे त्या पदाधिकार्यांच्या प्रभाव क्षेत्रातील गावांत याचा परिणाम निशीतच होणार आहे. यावेळेही जिंतूर व सेलू तालुक्यातील दोन मोठे पदाधिकारी बोर्डीकरांवरील नाराजीतून दुरावले गेले असून ते विरोधकांच्या कंपूत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्या-त्या सर्कलमध्ये बोडर्डीकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरवेळी थेट लढतीत कधी यश तर कधी अपयश स्विकारण्याचे काम बोर्डीकरांनी केले. मागील २०१९ च्या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढतीत व निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आ. बोर्डीकरांना यश मिळेल की नाही, अशी शक्यता होती. अखेर ३७१७ मतांचे मताधिक्य घेवून काठावर का होईना विजय मिळविता आला. मात्र यावेळी पारंपारीक शत्रुशी लढताना काँग्रेस बंडखोर व नंतर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात आलेल्या सुरेश नागरे यांच्याशीही लढत देण्याची वेळ आली आहे. तिरंगी लढतीत होणारे मतविभाजन हे सर्वाधिक बोर्डीकरांसाठीच थोकादायक ठरण्याचे चिन्हे आहेत. त्यामुळे प्रचार यंत्रणा राबवताना त्यांची मोठी दमछाक होवू लागली आहे.
जिंतूर मतदारसंघावर यापुर्वी माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर व मागील ५ वर्षांपासून आ. मेघना बोर्डीकर यांचे वर्चस्व राहिले असताना या ग्रामीण मतदारसंघातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. केंद्राच्या योजनेतून केवळ मोठे रस्ते झालेले आहेत. त्याच रस्त्यांचे श्रेय लाटून मोठा विकास केल्याचा आभास निर्माण करण्याचे काम बोर्डीकरांकडून होत असले तरी जिंतूरच्या डोंगराळ व दुर्गम भागातील रस्ते व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
जिंतूर शहरातील अरूंद रस्ते, अतिक्रमणे, उद्यानांची दुरावस्था आदी प्रश्न गंभीर असताना त्याकडे लक्ष न दिल्याने नागरिकांच्या रोषास सामोरे जाण्याची वेळ आली आहे. विकासाचा केवळ दिखावाच समोर केल्याने अनेक गावांमध्ये पोचताना आ. बोडॉकरांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. एका गावात तर प्रचारादरम्यान त्यांना प्रवेशबंदी देखील केली गेली.