आरटीओ पासिंग जोमात; रिक्षाचालक कोमात : रिक्षाचालकांचा दै. ‘पुढारी’शी संवाद

आरटीओ पासिंग जोमात; रिक्षाचालक कोमात : रिक्षाचालकांचा दै. ‘पुढारी’शी संवाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आरटीओकडून आता वाहनचालकाने गाडी पासिंग केली नाही, तर प्रतिदिन 50 रुपये दंड आकारणे सुरू केले आहे. त्यामुळे आता पासिंगसाठी उशिराने आलेल्या रिक्षाचालकांना 90 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दंड आरटीओकडून आकारला जात आहे. परिणामी, आरटीओ अधिकार्‍यांचे पासिंग आता जोमात सुरू झाले असून, सर्वसामान्य हातावरचे पोट असलेले रिक्षाचालक मात्र कोमात जाण्याची वेळ आली आहे.  केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार शहरातील उशिरा पासिंग करणार्‍या बहुतांश रिक्षाचालकांना आता पासिंगसाठी गेल्यावर मोठा दंड भरावा लागत आहे.

दंडाची रक्कम भरण्यासाठी रिक्षाचालकांकडे पैसे नाहीत अन् पासिंग झाले नाही, तर गाडी रस्त्यावर धावणार नाही, अशी स्थिती रिक्षाचालकांची झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने सोमवारी (दि. 27) पुण्यातील रिक्षाचालक आणि रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी शासनाच्या या निर्णयाविरोधात रिक्षाचालकांनी आणि वाहतूक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत रिक्षाचालक बापू धुमाळ, अंकुश नवले, अनंता वीर आणि मालवाहतूक संघटनेचे बाबा शिंदे यांच्यासह असंख्य रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली.

प्रतिदिन 50 रुपये दंड नको; 90 ते 1 लाखापर्यंत येतोय उशिराचा दंड

  • आरटीओचा पासिंग कोटा – दररोज 140 रिक्षा
  • फुलेनगर, दिवेघाट पासिंग होते अन् त्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट (योग्यता प्रमाणपत्र) मिळते.
  • योग्यता प्रमाणपत्र फी 600 रुपये आहे.
  • पासिंगसाठी इन्शुरन्स 3 हजार 500 रुपयांपर्यंत काढावा लागतो.
  • गाडीची कामे इतर करावी लागल्याने सुमारे सहा हजारांपर्यंत रिक्षाचालकांचा खर्च जातो.

कोणत्या आहेत मागण्या

  • तूर्त केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी.
  • सध्या तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षांना ते घेण्यासाठी मुदत मिळावी.
  • त्या मुदतीनंतर तंदुरुस्ती प्रमाणपत्र उशिरासाठी जाचक होणार नाही, इतपत रक्कम आकारावी.

असे उठले 50 रुपये दंडाचे वादळ

केंद्र शासनाने वाहनांची वेळेत फिटनेस तपासणी व्हावी, याकरिता 2016 साली प्रतिदिन 50 रुपये दंड आकारण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, बस असोसिएशनने या अधिसूचनेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे त्या वेळी किमान 2015 च्या आतील वाहनांसाठी ही रक्कम आकारण्यासाठीच्या अधिसूचनेला स्थगिती आली होती. मात्र, 15 वर्षांनंतरच्या वाहनांकडून पासिंग नसल्यास 50 रुपये दंड परिवहन विभागाला आकारण्यास परवानगी होती.

मात्र, एका रिक्षा संघटनेने सर्वच गाड्यांसाठी 50 रुपये दंड नको, या मागणीसाठी उच्च न्यायालयाला दिलेल्या आव्हानानंतर न्यायालयाने दोन्ही केस एकत्र करून अधिसूचनेवर दिलेली स्थगिती उठवली. त्यामुळे आता सरसकट उशिरा पासिंग करणार्‍या सर्वच वाहनांना (15 वर्षे आतील आणि 50 रुपये दंड) परिवहन विभागाकडून वर्षानंतर आकारला जात आहे. त्यामुळे पासिंग वेळेत न करणार्‍या वाहनचालकांना दंडाचा मोठा भुर्दंड बसत आहे. इतर वाहनचालक हा भुर्दंड सहन करत आहेत. मात्र, सर्वसामान्य रिक्षाचालकांचे हाल होत आहेत.

योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करताना ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र संपलेले आहे, त्या दिवसापासून प्रतिदिन 50 रुपये अतिरिक्त फी दंडात्मक स्वरूपात घेण्याची तरतूद 2016 च्या केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार करण्यात आली आहे. त्या निर्णयाला माननीय उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आदेश होते. ते आदेश माननीय उच्च न्यायालयाने उठविले आहेत. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करताना उशीर झालेल्या प्रत्येक दिवसासाठी अतिरिक्त फी प्रतिदिन 50 रुपये लागू करण्यात
आली आहे.

– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

शासनाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच करू नये, त्यासाठी रिक्षाचालकांना काही महिन्यांची मुदत द्यावी. तसेच, दोन कोटी किंमत असणाऱ्या बसला तेवढा आणि रिक्षालाही तेवढाच दंड आकारला जात आहे. रिक्षा आणि बसमधील फरक शासनाने समजून घ्यावा, असा निर्णय लागू केल्यास रिक्षाचालक पासिंगसाठी जाणार नाहीत अन् त्यांचे पासिंग रखडेल. त्यानंतर जे घडेल, त्याला शासन जबाबदार राहील. त्यामुळे शासनाने हा मूळ निर्णय रद्द करावा.

– नितीन पवार, सरचिटणीस, पुणे, पिंपरी-चिंचवड

पुणे शहरामध्ये एका बिल्डरच्या मुलाने गाडीखाली दोन व्यक्तींना जिवे मारले. अशावेळी श्रीमंत बिल्डरचा मुलगा आहे म्हणून त्याला फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली आणि हातावर पोट असणार्‍या गोरगरीब रिक्षाचालकांना लेट पासिंग केली म्हणून लाखो रुपये दंड लावण्यात येत आहे, हे चुकीचे आहे. ते थांबवले गेले पाहिजे.

– बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news