

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणेकरांकडून सध्या साडेतीन मुहूर्तांचा योगायोग साधत वाहनांची खरेदी जोरदार सुरू आहे. खरेदी केलेल्या वाहनाला देखील क्रमांक व्हीआयपीच हवा, अशी पुणेकर वाहनचालकांची इच्छा, त्यामुळे पुणे आरटीओ प्रशासनाला सन 2023 या मागील वर्षभराच्या कालावधीत तब्बल 47 कोटी 14 लाख 96 हजार 807 रुपयांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या महसुलात 14 कोटींनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. पुणेकर वाहनचालक लकी असलेले नंबर किंवा जन्मदिवसाची तारीख ही नंबरप्लेटच्या माध्यमातून गाडीला लावण्यासाठी आग्रही असतात. यासाठी परिवहन विभागाकडून देखील पैशांची आकारणी करून त्यांना हवा असलेला क्रमांक उपलब्ध करून देते. त्यासाठी विशिष्ट रकमेचा धनादेश भरून तो आरटीओ कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर संबंधित वाहनधारकाला आवडीचा क्रमांक दिला जातो.
एक क्रमांकासाठी मोजले 12 लाख रुपये…
एका चारचाकी वाहनधारकाने त्यांच्या कारला 1 नंबर असावा, यासाठी तब्बल 12 लाख रुपये मोजल्याची नोंद आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. विशेषतः एक ते दहा या क्रमांकासाठी सर्वाधिक पैसे मोजले जात असल्याचे समोर आले आहे.
…अशी झाली वाढ
जानेवारी ते डिसेंबर 2022 मध्ये आरटीओ कार्यालयाला एकूण 33 कोटी 50 लाख 57 हजार 851 रुपये महसूल मिळाला, तर 2023 मध्ये यात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 मध्ये परिवहन विभागाला 47 कोटी 14 लाख 96 हजार 807 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यामुळे 2022 च्या तुलनेत 14 कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.