पिंपरी : 42 हाउसिंग सोसायट्यांमधील सदनिकाधारकांना 55 लाखांची सवलत

पिंपरी : 42 हाउसिंग सोसायट्यांमधील सदनिकाधारकांना  55 लाखांची सवलत
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सांडपाणीप्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) व झीरो वेस्ट प्रकल्प (कंपोस्टिंग प्लँट) राबविणार्‍या पिंपरी-चिंचवड शहरातील हाउसिंग सोसायट्यांतील तब्बल 10 हजार 853 सदि्नकाधारकांना मिळकतकरात एकूण 55 लाख रुपयांची घसघशीत सवलत देण्यात आली आहे. जास्तीत जास्त सोसायटीधारकांनी पर्यावरणपूरक सोसायट्या करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी बुधवारी (दि. 2) केले आहे. पालिकेकडे शहरातील 5 लाख 82 हजार मिळकतींची नोंद आहे. 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर या 7 महिन्यांत सुमारे चारशे कोटी रुपये कराचा भरणा झाला आहे.

शहरातील 42 मोठ्या हाउसिंग सोसायट्यांमध्ये एसटीपी व झीरो वेस्ट प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या सोसायट्यांमध्ये 10 हजार 853 सदनिका आहेत. या सर्व सदनिकाधारकांना मिळकतकरातील सामान्यकरात 55 लाखांची सवलत देण्यात आली आहे. या कर सवलतीमधून सोसायट्यांना त्यांचा एसटीपी व झीरो वेस्ट प्रकल्प राबविण्यासाठी 25 ते 50 टक्के रक्कम उभी राहिली. त्यामुळे जास्तीत जास्त सोसायटीधारकांनी पर्यावरणपूरक सोसायट्या निर्माण करून सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. त्यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

दरम्यान, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी 147 सोसायटींनी पालिकेकडे ऑनलाइन अर्ज केले होते. मात्र, त्यामधील अनेक सोसायट्यांमध्ये ऑनसाईट कंपोस्टिंग यंत्रणा व एसटीपी कार्यान्वित नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर एकाच सोसायटीतील अनेकांनी अर्ज भरले होते. असे एकूण 147 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

मिळकतकरातील सामान्यकरात अशी आहे सवलत
ऑनसाईट कंपोस्टिंग यंत्रणा कार्यान्वित असलेल्या हाउसिंग सोसायटी (ओला कचरा 100 टक्के जिरविणार्‍या आस्थापना) – 5 टक्के
एसटीपी कार्यान्वित असलेल्या हाउसिंग सोसायटी – 3 टक्के
ऑनसाईट कंपोस्टिंग यंत्रणा व एसटीपी कार्यान्वित असलेल्या हाउसिंग सोसायटी – 8 टक्के
झीरो वेस्ट संकल्पना राबविणारी हाउसिंग सोसायटी (ओला व सुका कचरा 100 टक्के जिरविणार्‍या आस्थापना) – 8 टक्के
झीरो वेस्ट संकल्पना राबविणारी (ओला व सुका कचरा 100 टक्के जिरविणार्‍या आस्थापना) व एसटीपी असलेल्या हाउसिंग सोसायटी – 10 टक्के

थेरगावात सर्वाधिक पर्यावरणपूरक सोसायट्या
या सवलत योजनेतून सर्वाधिक थेरगाव करसंकलन कार्यालय क्षेत्रातील 10 सोसायट्यांमधून 1 हजार 904 सदि्नकाधारकांना लाभ झाला आहे. चिंचवडमधून 7 सोसायट्यांतून 1 हजार 416, वाकडमधून 6 सोसायट्यांतून 1 हजार 664 आणि पिंपरीगाव येथील 4 सोसायट्यांमधून 1 हजार 877 सदि्नकाधारकांना पर्यावरणपूरक सवलतीचा लाभ मिळाला आहे.

सोसायट्यांनी जानेवारीपर्यंत अर्ज करावेत
ऑनसाइट कंपोस्ट सवलत योजनेसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया आहे. मात्र, महापालिकेने स्वतःहून ही सवलत देणे आवश्यक वाटल्याने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ज्या सोसायट्यांमध्ये पर्यावरण पूरक उपक्रम राबविले जातात, अशा सोसायट्यांची माहिती क्षेत्रीय कार्यालयांनी जानेवारी महिन्यापर्यंत करसंकलन विभागाला द्यावी. करसंकलन विभागाने 1 एप्रिल रोजी नवीन बिलात सवलत देऊन बिल तयार करून लाभ दिला जातो. त्याचबरोबर या सवलतींचा आढावा घेणे, या सवलतींमध्ये वाढ करणे, त्यासाठी आरोग्य व करसंकलन विभागप्रमुखांनी एकत्रितपणे पडताळणी करण्यात येत आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news