पिंपरी-चिंचवडमध्ये उपमहापौरपद आरपीआयला द्यावे

पिंपरी-चिंचवडमध्ये उपमहापौरपद आरपीआयला द्यावे
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात आरपीआयची ताकद मोठी आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन पक्ष पुढे जात आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून 139 पैकी 39 जागा आरपीआयसाठी घेण्याचा प्रस्ताव स्थानिक पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

त्यावर भाजप श्रेष्ठींशी चर्चा करून अधिकाधिक जागा मिळवू. पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये उपमहापौरपद आरपीआयला द्यावे, अशी आग्रही मागणी आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (दि.3) केली.

पक्षाच्या सत्ता संकल्प मेळाव्यासाठी शहरात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी पक्षाच्या महिला आघाडी सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, ख्याजाभाई शेख, बाळासाहेब भागवत, कुणाल व्हावळकर आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नव्यानेच नोंदणी करण्यात आली आहे. जोपर्यंत पक्षाला 6 टक्के मतदान होत नाही, तोपर्यंत भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या जातील.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आरपीआयचे खासदार व आमदार निवडून आल्यास पक्षाला स्वतंत्र चिन्ह मिळेल. त्यावेळी आरपीआयच्या चिन्हावरच निवडणुका लढवू, असे आठवले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

पंतप्रधान आवासमध्ये एकही घर न मिळाल्याने आश्चर्य

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील अजंठानगर येथील 600 कुटुंबांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. श्रीमंत समजल्या जाणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना सुरू होऊन 5 वर्षे झाले तरी,

अद्याप एकाही गरीबास घर मिळाले नसल्याबद्दल रामदास आठवले यांनी आश्चर्य व्यक्त केले. योजनेसाठी निधी कमी पडत असल्यास दुप्पट निधी मिळवून देऊ, असे ते म्हणाले.

रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्टया न हटविता, त्यांचे त्याच जागेत पुनर्वसन केले जावे. त्या संदर्भात रेल्वे व राज्य शासनाशी चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news