पिंपरी: ‘व्हॅलेंटाईन डे’साठी बाजारपेठेत गुलाबाचा दरवळ, डच गुलाबाला मिळतेय पसंती,

पिंपरी: ‘व्हॅलेंटाईन डे’साठी बाजारपेठेत गुलाबाचा दरवळ, डच गुलाबाला मिळतेय पसंती,

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या 'व्हॅलेंटाईन डे' साठी मावळ परिसरातून पिंपरी-चिंचवडमधील फुल बाजारात डच गुलाबाच्या फुलांची आवक होत आहे. पुढील दोन दिवसांत ही आवक आणखी वाढेल. डच गुलाबाचे दर वाढले असले तरी त्याला मागणी कायम असल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले.

'व्हॅलेंटाईन डे' हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तरुण-तरुणींकडून गुलाबाच्या फुलांना मागणी असते. त्याचप्रमाणे, आकर्षक वेष्टनात देण्यात येणारा गुलाब तसेच, राऊंड बुकेमध्ये सजविलेली गुलाबाची फुले यांनाही चांगली पसंती मिळते. ही बाब लक्षात घेऊन फुल विक्रेत्यांनी गुलाबाच्या फुलांना आकर्षक वेष्टनात सजावट करण्यास सुरुवात केली आहे. 'व्हॅलेंटाईन डे'साठी किरकोळ बाजारामध्ये सध्या पॅकींगमधील गुलाबाचे एक फुल 20 ते 30 रुपयांना मिळत आहे. तर, डच गुलाब गड्डीचे (20 फुले) दर 300 रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहे. डच गुलाब गड्डीच्या दरात शनिवारपासून (दि. 11) वाढ झाली आहे. यापूर्वी डच गुलाब गड्डीचे दर 100 ते 200 रुपयांपर्यंत होते.

साधा गुलाब मात्र स्वस्तात

एकीकडे डच गुलाब भाव खात असताना साध्या गुलाबाचे एक फुल 10 रुपयांपर्यंत विकले जात आहे. तर, साध्या गुलाबाच्या 10 फुलांची एक गड्डी 60 ते 80 रुपये या किमतीत उपलब्ध आहे. पिवळ्या गुलाबाची फुले देखील बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मात्र, त्यांना तुलनेत मागणी कमी आहे.

आवक वाढणार

पिंपरीतील फुलबाजारात प्रामुख्याने मावळ, तळेगाव, साळुब्रमे, लोणावळा या भागातून गुलाबाच्या फुलांची आवक होते. दोन दिवसांपासून ही आवक कमी आहे. मात्र, व्हॅलेंटाईन डेसाठी शेतकर्‍यांनी फुलांची साठवणूक केली असल्याने सोमवारपासून फुलांची आवक आणि मागणीही वाढेल, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news