‘रायरेश्वर’वर रोहित्राची जोडणी यशस्वी

‘रायरेश्वर’वर रोहित्राची जोडणी यशस्वी

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  रायरेश्वर किल्ला केवळ चढून जाणेसुद्धा सोपे काम नाही. असे असताना किल्ल्यावरील नादुरुस्त झालेले 700 किलो वजनाचे रोहित्र बदलण्याची अवघड मोहीम अवघ्या तीन दिवसांत महावितरणच्या जिगरबाज कर्मचार्‍यांनी फत्ते केली. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनीही परिश्रम घेतले. किल्ल्यावर 2019 साली महावितरणच्या कर्मचार्‍यांनी रोहित्र आणि खांब अंगाखांद्यावर नेऊन जोडले होते. त्यापैकी एक 63 केव्हीचे रोहित्र शनिवारी (दि. 3) नादुरुस्त झाले. ते जागेवरच दुरुस्तीसाठी शाखा अभियंता सागर पवार यांनी प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. त्यामुळे त्याजागी नवीन रोहित्र बसवणे हे मोठे आव्हान होते.

एका ठेकेदाराने त्याचे 8-10 परप्रांतिय मजूर पाठवले. हिर्डोशी शाखेचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ मदत करण्यास पुढे आले. परंतु, समोरचा सह्याद्री पाहून मजुरांनी माघार घेत पळ काढला. मात्र महावितरण कर्मचार्‍यांनी हार मानली नाही. जवळपास 6 किलोमीटरचे डोंगरदर्‍यातील अंतर पार करायचे होते. बुधवारी (दि. 7) सकाळी मोहीम सुरू झाली. पहिला टप्पा शिडीचा होता. अरुंद व खडी पायवाट. त्यात किमान 700 किलो वजनाचे रोहित्र. नवगणची (लाकडापासून बनवलेले जुगाड) मदत घेत मोठ्या हिंमतीने पहिला टप्पा गाठला.
दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 8) कड्यापासून 5 किलोमीटरचा टप्पा सायंकाळी पूर्ण झाला. शुक्रवारी (दि. 9) सकाळी तिसरा टप्पा सुरू केला. जुने रोहित्र उतरून नवे चढवायचे व तांत्रिकबाबी पूर्ण करून ते चालू करणे ही कामे होती.

'हर हर महादेव' व छत्रपती शिवरायांचा जयघोष करत, सर्व आव्हानांना तोंड देत दुपारी अडीचच्या सुमारास नवे रोहित्र सुरू करण्यात कर्मचार्‍यांना यश आले. शाखा अभियंता सागर पवार यांच्यासह यंत्रचालक दीपक शिवतरे, जनमित्र राजू वणवे, रणजित बाबर, भगवान ठाकूर, निम्नस्तर लिपिक अक्षय शिवतरे, बाह्यस्रोत कर्मचारी गुणाजी तुपे, संतोष जेधे, श्रीकांत पारठे, अजय पारठे, निवृत्ती कंक, आखाडे एजन्सीचे विजय नवले व संजय पाटील यांचा या मोहिमेत सहभाग होता. तर धानवली व वाघमारे वस्तीवरील सुरेश वाघमारे, लक्ष्मण धानवले, श्रीराम धानवले, नथु धानवले, गणेश धानवले, रामभाऊ डोईफोडे, नामदेव वाघमारे, गणेश वाघमारे, अनिल धानवले, अजित धानवले, मुकुंद धानवले व संतोष धानवले या ग्रामस्थांनीही अथक परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news