पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबीयांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या गोविंद बागेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडी येथे दिवाळी पाडवा साजरा केला. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. ते आज बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले की, दिवाळी पाडवा साजरा करण्याची ही परंपरा शरद पवार यांनी बारामतीत पहिल्यांदा सुरू केली. लोक त्यांना भेटायला येतात आणि गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. पवारसाहेबांना पाठिंबा देणारे लोक त्यांना भेटायला येतात. ही परंपरा शरद पवार सुरू केली होती, आणि भाजपवाल्यांना याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी आधी कुटुंब तोडले, मग पक्ष फोडला आणि मग अजितदादांच्या माध्यमातून दुसरा पाडवा साजरा करायला लावला. त्यांना विचारायला हवे की त्यांनी दुसरा पाडवा का साजरा केला, असा निशाणा पवार यांनी साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर गतवर्षी गोविंदबागेतील पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहिले नव्हते. परंतु, त्यांनी स्वतंत्रपणे कार्यक्रमाचे आयोजनही केले नव्हते. यंदा, मात्र त्यांनी पाडव्यासाठी स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दरम्यान, दिवाळीच्या पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून चाहत्यांनी गर्दी केली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, नगर आदी जिल्ह्यातून चाहते पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठ आले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.
'एकच वादा अजित दादा'ची घोषणाबाजी कार्यकर्ते करीत आहेत. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांची गर्दी होऊ नये म्हणून रांगा लावण्यात आल्या आहेत. अजित पवार यांच्या बरोबरच खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना देखील चाहते पाडव्याच्या शुभेच्छा देत आहेत.