

पारगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: उकाड्यामुळे बंगल्याच्या टेरेसवर कुटुंब झोपल्याचा फायदा घेत चोरट्यांनी रोख 25 हजार व दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. नागापूर (ता. आंबेगाव) येथील निकम-पोहकरमळ्यात मंगळवारी (दि. 16) पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संजय पोहकर पाटील यांनी पारगाव पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
नागापूर गावच्या पश्चिमेला निकम-पोहकरमळा आहे. मंगळवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास येथील लहू मस्के यांच्या घराची खिडकी चोरट्यांनी उघडली. घरातील कांताबाई लहू मस्के यांनी खिडकीतून पाहिले, तर चार ते पाच जण त्यांना दिसले. त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या रमेश दत्तात्रय पोहकर यांच्या बंगल्याच्या दरवाजाची कडी कटावणीने काढून आतमध्ये प्रवेश केला. पोहकर कुटुंबीय हेे टेरेसवर व काही जण पहिल्या मजल्यावर झोपले होते. याचा फायदा चोरट्यांनी घेत कपाटामधील रोख 25 हजार रुपये व दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
सकाळी कुटुंबीय खाली आले असता त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. पारगावचे पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांनी घटनास्थळी पाहणी करीत पंचनामा केला. बाजार समितीचे माजी उपसभापती देवदत्त निकम, गणेश यादव, सुनील शिंदे यांनी पोहकर कुटुंबीयांची भेट घेत पाहणी केली.
दोन दिवसांपूर्वीच नागापूर हद्दीत मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याचे 27 ढापे चोरट्यांनी लांबविले. त्यानंतर लगेचच ही चोरीची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच गणेश यादव यांनी केली.