सेवा रिक्षाची; दैना पुणेकरांची ! रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा बूथ नसल्यामुळे लूट

सेवा रिक्षाची; दैना पुणेकरांची ! रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा बूथ नसल्यामुळे लूट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकावर असलेले प्रीपेड रिक्षा बूथ गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे येथील रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्यांची लूट करत आहेत, त्यामुळे रिक्षाच्या सेवेमुळे पुणे रेल्वे स्टेशन भागात पुणेकर प्रवाशांची चांगलीच दैना उडत आहे.

रेल्वे प्रशासन, पुणे शहर वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पुणे रेल्वे स्थानक परिसरात अनेकदा प्रीपेड रिक्षा बूथ सुरू करण्यात आले आहेत. मात्र, काही दिवस चालल्यावर हे बूथ काही ना काही कारणामुळे सातत्याने बंद पडत आहेत. यामुळे रेल्वेने पुण्यात येणार्‍या प्रवाशांची सर्रास लूट करण्यात येत आहे. यात लूट करण्याचे प्रमाण सकाळ आणि दुपारच्या सुमारास कमी असते. मात्र, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी येथून जाणार्‍या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे दादागिरी करून घेतले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

आता तरी पुढाकार घ्यावा…

पुणे रेल्वे स्थानकावर बंद पडलेले प्रीपेड रिक्षा बूथ सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी दाखविली आहे. मात्र, इतर प्रशासकीय विभाग मागील काही दिवस याकरिता पुढाकार घेत नसल्याचे दिसत होते. आतातरी सर्व संबंधित विभागांनी पुढाकार घेऊन आमची होणारी लूट थांबवावी, तसेच सुरू केलेले प्रीपेड बूथ पुन्हा बंद पडू नये, याकरिता ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून
करण्यात येत आहे.

आरटीओशी आमची चर्चा झाली आहे. हे बूथ सुरू करण्याला कोणतीही हरकत नाही. सुरुवातीला बूथच्या जागेवरून चर्चा सुरू होती. रेल्वे प्रशासनाने या परिसरात कुठेही हे बूथ सुरू करावे. आमची हरकत नसेल.

                                                              – विजय मगर,
                                              उपायुक्त, पुणे शहर वाहतूक पोलिस

आम्ही पुणे रेल्वे स्थानकावरील प्रीपेड रिक्षा बूथ सुरू करण्याबाबत पोलिस प्रशासनाशी वारंवार चर्चा केली आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल याकरिता उचलण्यात आलेले नाही. त्यांनी सकारात्मक होऊन पुढाकार घेतल्यास लगेचच बूथ सुरू करण्यात येईल.
                                            – डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय
                                        वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे पुणे विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news