खडकवासला: कोट्यवधी रुपये खर्च करून चकाचक केलेल्या धायरी, नर्हे, किरकटवाडी, नांदोशीसह सिंहगड रस्ता परिसरातील रस्त्यांची गेल्या चार-पाच दिवसांपासून पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे खड्डे पडून अक्षरश: चाळण झाली आहे.
खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. पाण्याची डबकी, खड्डे चुकवताना वाहने घसरून पडत आहेत. तसेच, धडकून अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांचे हाल होत आहे. (Latest Pune News)
सर्वात गंभीर स्थिती सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळील दळवीवाडी- धायरी, डीएसके विश्व रस्त्याचे झाली आहे. दळवीवाडीतील अंध शाळेजवळील मुख्य सिंहगड रस्त्यावर पाणी साठून दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत. त्यातून ये- जा करताना वाहनचालकांसह पादचार्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. धायरीतील रायकर मळा, महादेव मंदिर आदी ठिकाणच्या रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. नांदेड फाटा ते गावठाण रस्त्यावर पाणी वाहत आहे.
अद्याप पावसाळा सुरू झाला नाही तरी थोड्याशा पावसाने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाची कामे करणार्या ठेकेदार व संबंधित अधिकार्यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून रस्त्यांची दुरुस्ती करावी.
- संदीप चव्हाण, माजी उपसरपंच, धायरी
दोनच महिन्यांपूर्वी दळवीवाडी ते बारांगणीमळा रस्त्याचे कोट्यवधी रुपये खर्च करून चकाचक डांबरीकरण केले होते; मात्र दळवीवाडी फाट्यावर मुख्य सिंहगड रस्त्यापासूनच खड्डे पडले आहेत.
- इंद्रजित दळवी, कार्याध्यक्ष, सिंहगड परिसर विकास समिती
धायरी येथील काही रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली आहे. खड्डे पडलेल्या व पाणी साठणार्या ठिकाणांची पाहणी करून तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
- तिमया जगले, प्रभारी सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय