

पुणे: भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे साने गुरुजीनगर, आंबिल ओढा येथील कार्यालय आणि त्यांचीच भ्रष्टाचारात अडकलेली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र वीजचोरीत अडकल्याची माहिती अधिकारात उघड झाल्याने काँग्रेस- शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
शुक्रवारी काँग्रेस-शिवसेना एकत्र शिष्टमंडळाने महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांची भेट घेऊन त्यांना घेराव घातला आणि प्रश्नांची सरबत्तीच केली. अंदाजे 3000 प्रति चौरस फूट असणारी भव्य दुमजली कै. भानुदास गेजगे व्यायामशाळा तसेच विरंगुळा केंद्र पुणे मनपाच्या वास्तू सन 2012 पासून अस्तित्वात आहे. (Latest Pune News)
ही वास्तू पुणे मनपा क्रीडा व मालमत्ता विभागाकडे 9 एप्रिल 2025 पर्यंत हस्तांतरित करण्यात आलेली नाही. असे असतानाही सन 2012 पासून सदर तीनही वास्तूंना वीजपुरवठा होत आहे. माहिती अधिकारात माहिती मागविली असता 26 एप्रिल 2025 च्या महावितरण पेशवे पार्क उपविभाग कार्यालयातील स्थळपाहणी अहवालात हा वीजचोरीचा प्रकार निदर्शनास आला आहे.
महावितरण पेशवे पार्क विभागाने त्यांना फक्त एक वर्षाचा दंड म्हणून 95,330 रुपये आकारला. मात्र, 12 वर्षांची थकबाकी का वसूल केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेस कार्यकर्ते सागर धाडवे यांनी केला आहे. मुख्य अभियंता काकडे यांनी सदर वीजचोरी विषयात कडक कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना दिले.
या वेळी शिष्टमंडळात राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे शहराध्य किशोर मारणे, महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसचे अक्षय जैन, शिवसेना प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, युवक काँग्रेस उपाध्यक्ष कुणाल काळे, पुणे शहर सचिव अविनाश अडसूळ, कोथरूड विभाग उपाध्यक्ष हनुमंत गायकवाड उपस्थित होते. सदर वीजचोरी प्रकरणाची माहिती काँग्रेस कार्यकर्ते तक्रारदार सागर धाडवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांना मेलद्वारे पाठविल्याचे पत्रकात म्हटले.