

पिंपरी(पुणे) : पिंपरी ते दापोडी मार्गावर महामेट्रोकडून मेट्रोचा मार्ग तयार करण्यात आला आहे. सव्वावर्षापासून धावत असलेल्या मेट्रोचा नागरिकांना काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. असे असताना स्टेशनच्या कामासाठी रात्रीसह दिवसाही रस्ता अडविला जात आहे. त्यामुळे उर्वरित रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन रहदारी संथ होते. महामेट्रोकडून होत असलेल्या अडवणुकीला लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरात चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपूल ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत मेट्रोचा मार्ग तयार झाला आहे. यामार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी हे सहा मेट्रो स्टेशन आहेत. मेट्रोची काम पूर्ण झाल्याचा दावा करीत सव्वावर्षापूर्वी प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. मात्र, अद्याप मेट्रोची कामे सुरूच आहेत. त्यासाठी ग्रेडसेपरेटर किंवा सर्व्हिस रस्ता वारंवार बंद केला जात आहे. मोठी क्रेन लावून काम केले जात आहे.
मेट्रोला रात्री अकरानंतर रस्ता बंद करून काम करण्याची वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली आहे. तसे न करता केव्हाही रस्ता बंद करून बिनधास्तपणे काम केले जात आहे. त्यामुळे एका मार्गावरील वाहतूक दुसर्या मार्गावर वळविली जाते. वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. दुसरीकडे, शहरातील नागरिकांना मेट्रोचा काहीच लाभ होत नाही. मेट्रो रिकामीच धावत आहे. अशी परिस्थिती असताना नाहक दुरुस्ती कामासाठी रस्ता अडविणे योग्य नसल्याचे त्रस्त वाहनचालकांचे मत आहे. दुरुस्तीची कामे रात्री अकरानंतर करावीत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.