लसीकरणाअभावी जनावरांना ‘लम्पी’चा धोका; पुणे शहरालगतच्या भागातील चित्र

लसीकरणाअभावी जनावरांना ‘लम्पी’चा धोका; पुणे शहरालगतच्या भागातील चित्र

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: शहरालगत महापालिका हद्दीतील जनावरांना लसीकरणाअभावी लम्पी रोगाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिंहगड रोड, वडगाव धायरी, नांदेड, शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर परिसरात पाच हजारांहून अधिक म्हशी, गायी, बैल आदी जनावरे आहेत. 'जिल्ह्यासह पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या शहरी भागांत जनावरांना 'लम्पी'ची लागण झाली आहे. मात्र, पुण्यालगतच्या दाट लोकवस्तीच्या भागातील जनावरे लसीकरणापासून वंचित असल्याचे गंभीर चित्र पुढे आलेे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. ए. विधाते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्या हद्दीतील जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. त्याप्रमाणे पुणे महापालिकेने त्यांच्या हद्दीतील जनावरांचे लसीकरण करावे. असे असले तरी नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसह परिसरातील जनावरांचे लम्पी लसीकरण करण्यात येत आहे. खडकवासला भागात नुकतेच लसीकरण केल आहेे. माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे म्हणाल्या, 'महापालिकेत समावेश केलेल्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे या भागांत दुग्धव्यवसाय आहे. मात्र, जनावरांचे लसीकरण केले नाही.

गायींची संख्या अधिक आहे. 'लम्पी'चा धोका असल्याने प्रशासनाने लसीकरण सुरू करावे.'हवेली तालुका पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वामराव डिबेटवार म्हणाले, 'तालुक्यातील अनेक गावे महापालिकेत समाविष्ट केली आहेत. या ठिकाणी पशुपालन व्यवसाय आहे. लम्पीचे लसीकरण व प्रतिबंधक उपाययोजना केल्या जाणार आहेत.'धायरी-रायकरमळा, किरकटवाडी, खडकवासला, कोल्हेवाडी, नांदेड, कोंढवे धावडे, कोपरे शिवणे परिसरात जनावरांचे गोठे आहेत. मात्र, याची नोंदच महापालिका प्रशासनाकडे नाही.

धायरी परिसरात दुभत्या व भाकड गायी, म्हशी या जनावरांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे. 'लम्पी'च्या भीतीमुळे शेतकरी, दुग्धव्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. प्रशासनाने साथ रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

                                        – संदीप चव्हाण, माजी उपसरपंच, धायरी

सिंहगड रोड, वडगाव धायरीसह नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे करण्यात आली आहे.

प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news