

खेड शिवापूर: खेड शिवापूर परिसरातील राहटवडे गावाच्या हद्दीत रिंगरोडचे काम करणाऱ्या मजुरांचे मलमूत्र भरलेला टँकर चक्क शिवगंगा नदीशेजारी असलेल्या ओढ्यात टाकण्याचा प्रताप संबंधित ठेकेदार करीत आहे. ओढ्यात मलमूत्र टाकताना योगेश मांगले, महेश जायकर, योगेश कोंडे, प्रदीप जायकर, हेमंत जायकर या नागरिकांनी पकडून संबंधित ठेकेदाराला राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Latest Pune News)
राहटवडे (ता. हवेली) ते शिवरे (ता. भोर) या दरम्यानच्या रस्त्याचे काम ग््राीनफा कंपनीने घेतले आहे. त्यामुळे राहटवडे गावच्या हद्दीत या रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या सुमारे 250 मजुरांना त्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांचे मलमूत्र टँकरमध्ये भरून तो रांजे (ता. भोर) हद्दीत असलेल्या ओढ्यामध्ये आणून टाकला जात आहे. यामुळे ओढ्यासह शिवगंगा नदीचे पाणी दूषित होत आहे. याच ओढ्याशेजारी तसेच परिसरात राहटवडे, कोंढणपूर, शिवापूर, रांजे या गावाच्या विहिरी आहेत. याच विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे भविष्यात या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, सिंहगड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश मांगले व सहकाऱ्यांनी हा मलमूत्र टाकतानाचा टँकर पकडून राजगड पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रस्त्याच्या ठेकेदाराने सांडपाणी व मलमूत्र इतर ठिकाणी किंवा शोषखड्डा घेऊन त्यामध्ये टाकण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या ठेकेदाराने 2 हजार 200 कोटी रुपयांचे टेंडर घेतलेले आहे. त्यांच्याकडे पोकलेनसारख्या मोठ्या मशिनरी आहेत. त्यामुळे त्यांनी एखादा शोषखड्डा घेणे आवश्यक आहे किंवा एसटीपी प्लांट उभारावा. टँकरमधील पाणी लॅबमध्ये तपासणीसाठी दिले असून, त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, जिल्हाधिकारी, एमएसआरडीई, प्रांताधिकारी, तहसीलदार व राजगड पोलिसांना यावर कारवाई व्हावी, यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
योगेश मांगले, संस्थापक अध्यक्ष, सिंहगड फाऊंडेशन