

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतर पुणे, पिंपरी-चिंचवडकरांनी मालमत्ता खरेदी-विक्रीकडे मोर्चा वळविला आहे. चालू आर्थकि वर्षात केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतून तब्बल साडेसहा हजार कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, दोन वर्तुळाकार रस्ते, अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, रोजगाराची हमी, अशा विविध घटकांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ता खरेदी-विक्रीत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नोंदविले आहे.
1 एप्रिल 2022 ते आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल अडीच लाखांपेक्षा जास्त दस्त नोंद झाले आहेत. त्यातून साडेसहा हजार कोटींचा महसूल मिळाला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 1 लाख 70 हजार 162 दस्त नोंद झाले. त्यातून शासनाला 4271.75 कोटींचा महसूल प्राप्त झाला. डिसेंबर 2022 या महिन्यात 24 हजार 234 दस्त नोंद होऊन 799.68 कोटींचा महसूल मिळाला. जानेवारी 2023 या महिन्यात 23 हजार 957 दस्त नोंद होऊन 651.21 कोटींचा महसूल प्राप्त झाला. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसाठी राज्य शासनाने 5880 कोटी महसुलाचे उद्दिष्ट दिले होते.