

समीर सय्यद
पुणे : गावठाणापासून 200 मीटरच्या परिघातील आणि अंतिम प्रादेशिक योजनेतील क्षेत्राचे शासनाचे शुल्क भरून जमीन अकृषिक (एनए) करून घेण्याची मोहीम महसूल विभागाकडून राबविण्यात आली. त्यात 35 हजार 352 खातेदारांनी आपले क्षेत्र एनए करून घेतले. त्यातून सहा कोटी 30 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
घर बांधण्यासाठी एनए क्षेत्र केल्यानंतर बांधकाम परवाना दिला जातो तसेच बँकांकडून कर्जपुरवठाही सहज होत असतो. मात्र, गावठाण क्षेत्रात एनएविनाच बांधकामे करण्यात आली आहेत. ती बांधकामे नियमित करण्यासाठी एनए आवश्यक आहे. जिल्ह्यात गावठाणापासून 200 मीटर आतील क्षेत्र अकृषिक करण्यासाठी महसूल विभागाने डिसेंबर 2022 पासून विशेष मोहीम राबविली. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
अंतिम विकास आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रातील एनए करण्यामध्ये हवेली तालुक्यातील 21 हजार 445 खातेदारांनी आपले क्षेत्र एनए करून घेतले. त्यातून एक कोटी 96 लाख 16 हजार 693 रुपयांचा महसूल गोळा झाला, तर सर्वांत कमी जुन्नर तालुक्यात केवळ आठ खातेदारांनी एनए करून घेतले. त्यात 90 हजार 132 रुपये शासनाला मिळाले आहेत. गावठाणाच्या (42-ड) 200 मीटर आतील सात हजार 936 खातेदारांनी मोहिमेत सहभाग घेतला. त्याबदल्यात एक कोटी 29 लाख 85 हजार 211 रुपये महसूल प्राप्त झाला आहे. त्यात खेड तालुक्यात सर्वाधिक दोन हजार 751 जणांनी आपले क्षेत्र एनए करून घेतले आहे. त्यांच्याकडून 21 लाख 30 हजार 723 वसूल करण्यात आले आहेत.
…तर एनएची सनद दिली जाते
जमीन अकृषिक करण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यामुळे जमीनमालक विनाएनए जमिनीचे तुकडे करून गुंठेवारीने विक्री करतात. राज्य शासनाने गावठाण क्षेत्रापासून 200 मीटरच्या आतील जमिनीला अकृषिक सनद देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जमीन अकृषिक करण्यासाठी इतर कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही. भोगवटादाराने रक्कम भरल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत विहित केलेल्या नमुन्यात अकृषिक क्षेत्राशी सनद दिली जाते.
मंजूर झालेले प्रस्ताव…
तालुका आराखडा 200 मीटर
मंजूर आतील
हवेली – 21445 639
मावळ – 374 1622
मुळशी – 477 1178
शिरूर – 8 06
भोर – 39 16
पुरंदर – 63 75
खेड – 63 2751
जुन्नर – 7 17
बारामती 16 13
इंदापूर 1570 1118
दौंड 16 71
आंबेगाव 316
पिंपरी-चिंचवड 2975
पुणे शहर 16