

पौड; पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील सौंदर्यरत्न म्हणून ओळख असलेल्या घोडमांजरीचा डोंगर अर्थात कैलासगडावरील पांडवकालीन शिवमंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे. यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. यासाठी गडावरील मंदिरात अभिषेक, पूजन उत्सव तसेच गडाच्या पायथ्याला वडुस्ते गावात प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण सोहळा करण्यात आला.
शिवकाळात टेहळणीचा गड म्हणून ओळख असलेल्या कैलासगडावरील पांडवकालीन मंदिर गेल्या शेकडो वर्षांपासून नामशेष होण्याच्या मार्गावर होते. ही बाब गडसंवर्धन कार्य करणार्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने व समाजातील दानशूर मंडळींच्या सहकार्याने मंदिर जीर्णोद्धार कार्य हाती घेतले होते. चढणीसाठी अतिशय अवघड असलेल्या या गडावर बांधकाम साहित्य वाहून नेणे कठीण असतानाही शेकडो मावळ्यांनी वेळोवेळी श्रमदान मोहीम राबवून जीर्णोद्धार कार्य तडीस नेले आणि त्या ठिकाणी शिवमंदिर पूर्ववत उभे केले.
या मंदिराचा पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात वडुस्ते येथे पार पडला. या वेळी युवासेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे, सरपंच दीपाली कोकरे, अर्चना वाघ, उपसरपंच नंदू शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, शिवभक्त विशाल पडवळ, अनंतराव ढमाले, लहू वाळंज, सुभाष वाघ, रमेश पडवळ, रवींद्र मोहोळ, श्रमिक गोजमगुंडे, ज्ञानेश्वर पवळे, अंनतराव वाशिवले तसेच पंचक्रोशीतील मान्यवर मंडळी उपस्थित होते. गडावर मंदिराची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच शिवमंदिरात अभिषेक पूजन करण्यात आले. भंडार्याची उधळण करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
पोवाडे आणि शिवगीतांनी गड दुमदुमला
कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून हजारो मावळे उपस्थित होते. गडाच्या पायथ्याला शाहीर वैभव घरत व त्यांच्या सहकार्यांनी पोवाडे व शिवगीते सादर केली. ज्ञानेश्वरी घरत या बाल शाहीर कलाकाराने गायलेल्या शिवगीताने उपस्थितांची मने जिंकली. समारोप प्रसंगी हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी मार्गदर्शन केले.