पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील नागरी समस्यांचे निवारण 2027 पर्यंत करून देशातील सर्वांत स्वच्छ शहर बनविण्याचा संकल्प आपण पुणेकरांनी करावा, अशी सूचना माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केली. पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढील पंचवीस वर्षांचे धोरण आपण ठरविले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. जगदीश मुळीक फाउंडेशनतर्फे आयोजिलेल्या व्हिजन पुणे या शिखर परिषदेत ते बोलत होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुण्याच्या विकासासाठी त्यांची भूमिका मांडली.
मुळीक म्हणाले की, शहरातील नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी पुढील पंचवीस वर्षांचे धोरण ठरविण्याच्या उद्देशाने परिषदेचे आयोजन केले आहे. पुणे शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ विस्तारत असून, लोकसंख्या वाढत असल्याने पायाभूत सुविधांवर मर्यादा येत आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुण्यासाठीचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. पुणे शहराबरोबर समाविष्ट गावांच्या विकासासाठी पायाभूत सुविधा देण्याची आवश्यकता असल्याचे मत आमदार माधुरी मिसाळ यांनी मांडले. त्या म्हणाल्या की, पुण्यातील तज्ज्ञांनी मांडलेल्या व्हिजन पुण्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही घेतो. पर्यावरण आणि सर्वांगीण विकास करण्याची गरज असून, पीएमआरडीएला आर्थिक सक्षम केले पाहिजे.
शहरातील वाढत्या लोकसंख्येचा दबाव महापालिकेच्या सुविधांवर पडत असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत पीएमपी गाड्यांची प्रवास भाडेवाढ केली नाही, तरीदेखील पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा वापर केवळ 11 टक्के प्रवासी करीत असून, परदेशात ते प्रमाण 48 टक्के आहे. पुढील दोन वर्षांत पुण्यातील वाहतूक सिग्नल फ्रि होईल, तर पाच वर्षांत मेट्रोची कामे पूर्ण होतील. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सायबर क्राईम वाढत असल्याकडे लक्ष वेधले. त्यासाठी पाचही झोनमध्ये सायबर पोलिस स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे.
नागरिक आणि पोलिसांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होण्यासाठी पोलिस कर्मचार्यांना सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यासाठी स्वतंत्र विमानतळाची गरज आहे. जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके, मुंबई-पुणे बुलेट ट्रेनची गरज असल्याचे प्रतिपादन सुधीर मेहता यांनी केले. अनिरुद्ध देशपांडे यांनी पुणे शहरात होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी जिल्ह्याचा आणि लगतच्या जिल्ह्यांचा विकास करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. नगर नियोजनाविषयी दैनिक 'पुढारी'चे निवासी संपादक सुनील माळी म्हणाले, राज्यात नगर नियोजन कायद्यानुसार बनविलेला विकास आराखडा आणि प्रादेशिक विकास आराखडा यांची अंमलबजावणी केली पाहिजे. त्यामुळे राहण्यास योग्य शहरांची निर्मिती करता येईल.
प्रत्येक शहरात सॅटेलाइट सेंटर, ग्रोथ सेंटर निर्माण करावीत. राष्ट्रीय सेवायोजनेचे सल्लागार राजेश पांडे यांनी पुण्याच्या विकासासाठी व्यासपीठ विकसित करण्याची सूचना केली. व्हिजन पुणे परिषदेत सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या संवादातून धोरण तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल. या सूचनांचे दस्तऐवज निर्माण केला पाहिजे. संवाद, सहभाग आणि सामूहिक प्रयत्नांतून पुण्याला मोठे करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. दैनिक 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस, 'महाराष्ट्र टाइम्सचे' संपादक श्रीधर लोणी, ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड, क्रीडापटू शीतल महाजन यांचेही भाषण झाले. माजी नगरसेवक योगेश मुळीक यांनी आभार मानले.
हेही वाचा