वारजे / खडकवासला: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणाखालील मुठा नदीपात्रात सध्या महिला आणि नागरिकांची कपडे धुण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. जलसंपदा विभागाकडून रविवारी दुपारी तीनच्या सुमारास विसर्ग वाढविण्यात आल्याने कपडे धुण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या महिलांसह 4 ते 5 नागरिक अडकून पडले. याबाबत जलसंपदा विभागाला माहिती दिल्यावर विसर्ग कमी करण्यात आला आणि पाण्यात अडकलेल्या महिला आणि नागरिकांची सुखरूप सुटका झाली.
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात दुपारी बाराच्या सुमारास 844 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास सायरन वाजवून विसर्ग एक हजार 712 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. यामुळे धरणासमोरील नदी पात्रातील खडकांवर कपडे, गोधड्या धुणाऱ्या महिलांसह 4 ते 5 नागरिक पाण्यात अडकून पडले. (Latest Pune News)
त्यांनी आरडाओरडा करीत बचावासाठी जवळील खडकाचा आधार घेतला. पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्यांचा व्हिडिओ नागरिकांनी सोशल मीडियावर टाकला. याबाबत उत्तमनगर पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर जलसंपदा विभागाला माहिती देऊन विसर्ग कमी करण्यात आला आणि उत्तमनगर पोलिसांनी रेक्सु करुन पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली.
धरणसाखळीत शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने खडकवासला धरणातून जादा पाणी मुठा नदी पात्रात सोडले जात आहे. जलसंपदा विभागाकडून नागरिकांना नदी पात्रात न उतरण्याचे आवाहन केले जात आहे. असे असले तरी याकडे दुर्लक्ष करून काही महिला, नागरिक कपडे धुण्यासाठी धोकादायक नदी पात्रात उतरत आहेत.
- गिरीजा कल्याणकर -फुटाणे, शाखा अभियंता, खडकवासला धरण विभाग