पुणे: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शंभरपटीने एचवन-बी या व्हिसाचे शुल्क वाढवल्याने भारताला सहा महिने त्रासातून जावे लागेल. मात्र, त्याचा फटका आपल्यालाही मोठ्या प्रमाणावर बसत आहे, हे लक्षात येताच अमेरिकेला भारतासमोर गुडघे टेकावे लागतील. कारण, भारतीय लोकांसारखे चांगले मनुष्यबळ त्यांना मिळणार नाही, अशा प्रतिक्रिया भारतीय उद्योजक, आंतराष्ट्रीय तज्ज्ञ, नोकरदार यांनी व्यक्त केल्या आहेत.
अमेरिकेने तेथे नव्याने जाणाऱ्या भारतीय नागरिकांचा तात्पुरता व्हिसा एचवन-बीचे शुल्क सहा लाखांवरून सुमारे 88 लाख रुपये इतके जबर वाढविल्याने भारतातून विदेशात नुकतेच गेलेले, नजीकच्या काळात जाऊ पाहणारे नोकरदार विद्यार्थी, पालक आणि नोकरदारांना पाठविणारे उद्योजक हैराण झाले आहेत.(Latest Pune News)
यामुळे अमेरिकेतून शेकडो भारतीय तरुण नोकरदार विद्यार्थ्यांना मायदेशी परत येण्याची नामुष्की आली आहे. मात्र, या संकटकाळात भारताकडे मोठी संधी आहे, अशी दुसरी बाजू देखील तज्ज्ञांनी मांडली.
काय म्हणाले तज्ज्ञ... त्रासदायक बाजू...
जे जुने लोक हा व्हिसा घेऊन राहत आहेत, त्यांना या
निर्णयाचा फटका नाही.
जे नव्याने तेथे गेले आहेत किंवा जाणार आहेत. त्यांना आता अमेरिकेत जाण्याचे स्वप्नभंग ठरेल.
भारतीय कंपन्या आता कर्मचाऱ्यांना विदेशात पाठवताना खूप विचार करून पाठवतील.
दोन ते चार वर्षे जाण्यापेक्षा आता वर्षातून आठ दिवस अमेरिकेत पाठवावे लागेल.
भारतीय कंपन्या, नोकरदारवर्ग, विद्यार्थी यांचा स्वप्नभंग होईल.
विदेशात न जाता भारतात राहून तिथले काम करावे लागेल. जे खूप अवघड काम आहे.
भारतीयांचा कामाचा कालावधी क्लिष्टतेमुळे वाढू शकतो.
जमेची बाजू....
अमेरिकेतील गुगल, अमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्या हे भारतीय लोकच चालवत आहेत.
त्यामुळे भारतीयांना तेथे जाण्यास रोखणे, हे अमेरिकेला खूप महाग पडणार आहे.
जे काम अमेरिका सध्या 1 रुपयांत करीत आहे, ते काम भारतातून करावे लागणार असल्याने त्याला 3.5 रुपये खर्च येईल.
भारतीय लोकांसोबत दूरस्थ पद्धतीने काम करणे अमेरिकन लोकांना अवघड जाऊ शकते. कारण, इतके हुशार, प्रगत अन् स्वस्त मनुष्यबळ त्यांना तेथे मिळणे कठीण.
तीन दिवसांत प्रश्न सुटण्याची शक्यता
दिल्लीतील काही उच्चस्तरीय सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या विनंतीवर सांगितले की, भारत सरकार हा प्रश्न अत्यंत मुत्सद्दीपणे हाताळत आहे. यात भारत-अमेरिका देशात वाटाघाटी सुरू आहेत. प्रामुख्याने ट्रम्प यांच्या राजकीय खेळीचा तोटा तेथील उद्योगांनाच होऊ शकतो. प्रामुख्याने गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनसारख्या कंपन्या चिंतेत आहेत. त्यांचे सर्व काम त्यांना भारतातून करून घ्यावे लागणार आहे.
संकटकाळात भारताला खरेतर मोठी संधी आहे. व्हिसाचे शुल्क 6 लाख रुपयांवरून तब्बल 88 लाख करण्याचा त्यांनाच पश्चात्ताप होईल हे खरे. पण, त्यासाठी भारताला सहा महिने त्रास सोसावा लागेल. रोजगार जाणार नाही. मात्र, अमेरिकेत राहता येणार नाही तो स्वप्नभंग ठरणार आहे. मात्र, सर्व कामे भारतात येतील. रोजगार इकडे वाढेल. कारण, गुगल आणि अमेझॉन या कंपन्यांना भारतीय लोकांची गुणवत्ता माहीत आहे. त्यामुळे त्यांची सर्व कामे भारतात येतील. त्यामुळे आपल्या देशात सिलिकॉन व्हॅली तयार करण्याची संधी आली आहे.
- मुकुंद कुलकर्णी, उद्योजक, आंतराष्ट्रीय अभ्यासक, पुणे
माझे अनेक नातेवाईक अमेरिकेत आहेत. मेहुणा, त्यांची मुले तिकडे नोकरी करीत आहेत. त्यांना नोकरी सोडण्यास सांगण्यात आले असून, आता भारतात परत यावे लागणार आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका नव्या तरुण पिढीला बसणार आहे. अमेरिकेत आता सहजासहजी जाता येणार नाही.
- राजसिंग, उद्योजक, पुणे