वेल्हे: सिंहगड खोर्यातील खामगाव मावळ-मोगरवाडी (ता. हवेली) येथील कोट्यवधी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल व जलजीवन योजनांमधील भ्रष्टाचाराचे पडसाद विधिमंडळात उमटूनही प्रशासन सुस्त आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून येथील रहिवाशांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
सर्वांत गंभीर स्थिती खामगाव मावळ व वाड्या-वस्त्यांत आहे. नागरिकांना मिळेल तिथून उन्हात पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाईची झळ जनावरांनाही बसली आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे. (latest pune news)
सिंहगड किल्ल्याच्या खामगाव मावळ, मोगरवाडी, चांदेवाडी, माळवाडी आदी वाड्या-वस्त्यांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. खामगाव मावळ येथील रेवती दुधाणे म्हणाल्या, उन्हाळा सुरू झाला की पाणीटंचाई सुरू होते.
पाणीटंचाई आमच्या पाचवीलाच पुजली आहे. स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात खामगाव मावळच्या निकृष्ट दर्जाच्या पाणी योजनेचे वाभाडे काढले होते.
स्थानिक मावळा जवान संघटनेचे सिंहगड विभाग अध्यक्ष प्रशांत भोसले म्हणाले, स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी विनंती करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. राष्ट्रीय पेयजल व जलजीवन योजनेचे थेंबभरही पाणी गावात येत नाही.
खामगाव मावळ व वाड्या-वस्त्यांसाठी साडेतीन कोटी रुपये खर्चाची पाणी योजना राष्ट्रीय पेयजल योजनेतून दोन वर्षांपूर्वी राबविण्यात आली. या योजनेचे काम अर्धवट अवस्थेत असतानाच पुन्हा कोट्यवधी रुपये खर्चाची जलजीवन योजनेचे काम सुरू आहे.
मोगरवाडीत कसेबसे पाणी येते. स्थानिक रहिवासी देविदास बेलुसे यांनी आठ-दहा दिवसांनंतर कसेबसे पाणी येते असे सांगितले. खामगाव मावळमधील जुनी विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे शेकडो रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. सायकल, रिक्षा टेम्पो आदी वाहनांतून खानापूर, मणेरवाडी वसवेवाडी येथून पाणी आणले जात आहे.
याबाबत हवेली तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी म्हणाले, खामगाव मावळ येथील पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्याला तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. रहिवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.