

बारामती : पुढारी वृत्तसेवा : निरा-बारामती या राज्यमार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ झाल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पणदरे खिंड येथे निरा-बारामती रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. कठीण पूल ते पेशवेवस्ती यादरम्यानही रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. सर्वाधिक वाहतूक असलेला हा रस्ता असल्याने त्याची दुरुस्ती व देखभाल होणे गरजेचे आहे. वाहनचालकांनी याबाबत समाधान व्यक्त करीत दैनिक 'पुढारी'चे आभार व्यक्त केले.
या मार्गावरील काही पुलांची कामे चांगली झाली आहेत. मात्र, काही पुलांची कामे अर्धवट अवस्थेत राहिली आहेत. तीही वेळेत व्हावीत, अशी अपेक्षा वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील पुलांची कामे दर्जेदार केली, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. सध्या सोमेश्वर व माळेगाव सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करीत आहेत. ठिकठिकाणी रस्त्यांची चाळण झाल्याने वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. खचलेल्या साइडपट्ट्या, जीवघेणे गतिरोधक, झाडांच्या धोकादायक फांद्या, वेडीवाकडी धोकादायक वळणे, रस्त्यावरील गायब झालेले माहिती फलक, यावर लक्ष देण्याची गरज यानिमित्त व्यक्त होत आहे.