

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम तोरणागडाच्या डागडुजीच्या कामाला सोमवार (दि. 26)पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने साडेचार कोटी रुपयांचा निधी पुरातत्त्व खात्याला दिला आहे. वेल्हे मार्गावरील तोरणागडाच्या मुख्य बिन्नी दरवाजा व मार्गाच्या दुरुस्तीचे काम पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. सुरक्षेसाठी पर्यटकांना सावधागिरीचे आवाहन पुरातत्त्व खात्याने केले आहे.
गडावर ये-जा करण्यासाठी वेल्हे मार्गावरील बिन्नी दरवाजा मार्गाचा वापर पर्यटक मोठ्या संख्येने करतात. मेटपिलावरे मार्गाने वर्दळ कमी असते. बिन्नी प्रवेशद्वाराचे बुरूज, तटबंदीचे दगड उन्मळून आल्याने तसेच ढासळल्याने धोकादायक बनले आहेत. एका बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे दरवाजाच्या दुरुस्तीचे काम सावधानतेने केले जाणार आहे. त्यासाठी ठेकेदाराने 40 मजूर गडावर सज्ज केले आहेत. आठ दिवसांपासून मजुर गडावर बसून आहेत. सर्वाधिक पर्यटकांची वर्दळ बिन्नी दरवाजा मार्गाने आहे.
त्यामुळे पत्र्याचे बॅरिकेड्स लावून हा मार्ग तात्पुरता काही काळ बंद करण्यात यावा, अशा सूचना पुरातत्त्व खात्याने केली आहे. तसे पत्र संबंधित ठेकेदाराला दिले आहे. तोरणागडावर वर्षअखेरीमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. आज अखेरच्या रविवारी गड पर्यटकांनी गजबजून गेला होता. कामासाठी मुख्य वेल्हे मार्ग बंद करण्यात आल्यास नवीन वर्षाच्या सुरुवातीला पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागणार आहे.
विद्युतीकरणही मार्गी लागणार
तोरणागडाच्या बुरुजापर्यंत वीजपुरवठा सुरू आहे. तेथून पुढे किल्ला पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे गडावरील विद्युतीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. गडावरील मंदिर व पर्यटक निवास, पायर्या मार्ग आदी ठिकाणी वीज दिवे लावण्याची मागणी वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शंकरराव भुरुक यांनी केली होती. याबाबत वाहणे म्हणाले, बुरुजापर्यंत वीजपुरवठा आहे. तेथून पुढे मेंगाई मंदिर व गडावरील महत्त्वाच्या स्थळांवर वीजपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडून काम केले जाणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध आहे.
ही कामे केली जाणार
यंदाच्या आर्थिक वर्षात शासनाने मंजूर केलेल्या साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून गडाचा मुख्य बिन्नी दरवाजा डागडुजी तसेच, तोरणाजाई मंदिर, तळे, म्हसोबा टाके, श्री मेंगाईदेवी मंदिर आदीची दुरुस्ती यांसह खोकळ टाके ते मेंगाई मंदिर मार्गावर फरशी आदी कामे केली जाणार आहेत.
मुख्य बिन्नी दरवाजा मार्ग बंद न करता आवश्यक खबरदारी घेऊन बिन्नी दरवाजा व इतर दुरुस्ती करण्यात येईल. मात्र, काम सुरू असताना पर्यटकांनी सुरक्षेसाठी योग्य काळजी घ्यावी.
– विलास वाहणे,
सहसंचालक, पुरातत्त्व विभाग