

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवामुळे शहरात लहान-मोठ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असताना या कोंडीत रस्त्याच्या कडेला धूळ खात उभ्या असणार्या बेवारस वाहनांची भर पडत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवरही अनेक बेवारस वाहने उभी आहेत. त्यामुळे महापालिकेने या वाहनांवर नोटीस चिकटवून चोवीस तासांत ती हलविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ही वाहने जप्त करण्याचाही इशारा नोटिशीद्वारे दिला आहे.
शहरात 15 वर्षांहून अधिक जुन्या तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. नियमानुसार, संबंधित वाहनमालकांनी ही वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. मात्र, ही वाहने स्क्रॅप केली जात नाहीत. ती स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्यामुळे किंवा अन्य कारणाने या वाहनांचे मालक ही वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात. अशी असंख्य वाहने शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्षे धूळ खात उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांनाही सहन करावा लागतो. दुसरीकडे या वाहनांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अशी वाहने हलविण्यासाठी आरटीओच्या मदतीने वाहनमालकांना नोटीस बजावली जाते. नोटीस बजाविल्यानंतरही वाहने न हलविल्यास वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाते. मात्र, मागील काही महिन्यांपासून ही कारवाई बंद आहे. त्यामुळे या वाहनांचा वाहतुकीला आणि पादचार्यांना अडथळा होत आहे. त्यातच आता गणेशोत्सवामुळे शहरात गणेशभक्तांचा महापूर आहे. परगावांहून गणपती पाहण्यासाठी येणार्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीत रस्त्याच्या कडेला धूळ खात उभ्या असलेल्या बेवारस वाहनांची भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिका आणि पोलिस प्रशासनातील अधिकार्यांनी गणेश विसर्जन मार्गांची पाहणी केली. या पाहणीत लक्ष्मी रस्ता (नाना पेठ परिसरात), टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता आदी रस्त्यांवर अनेक ठिकाणी बेवारस वाहने उभी असल्याचे निदर्शनास आले. शहरातील रस्त्यांवर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांची महापालिकेकडे तक्रार करण्यासाठी टोल फ—ी नंबर आहे. मात्र, त्यावर फार कोणी तक्रारी नोंदवत नाही.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलिस प्रशासनाने विसर्जन मार्गांची पाहणी केल्यानंतर अनेक ठिकाणी बेवारस वाहने आढळली. या वाहनांवर नोटीस चिकटवून ती चोवीस तासांत हलविण्याच्या सूचना केल्या आहेत.
– माधव जगताप, उपायुक्त,अतिक्रमण विभाग, महापालिका