पुण्यातील धार्मिक स्थळांचे अर्थचक्र रुळावर

पुण्यातील धार्मिक स्थळांचे अर्थचक्र रुळावर

सुवर्णा चव्हाण

पुणे : पुण्यातील धार्मिक स्थळांचे अर्थचक्र आता रुळावर यायला सुरुवात झाली असून, धार्मिक स्थळांना मिळणार्‍या देणग्या आणि निधींची संख्याही वाढली आहे. त्यामुळे धार्मिक संस्थांना धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत असून, धार्मिक संस्थांना धार्मिक पर्यटनातूनही चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.

महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील पर्यटक पुण्यातील धार्मिक स्थळांना भेट देत आहेत. अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, जर्मनी येथूनही पर्यटक धार्मिक स्थळांना भेट देत असून, म्हणूनच धार्मिक संस्थांच्या देणगी, निधीत वाढ झाली आहे. आर्थिक फटक्यातून धार्मिक संस्था सावरल्या आहेत.

धार्मिक संस्थांकडे वर्षभरातील महोत्सव आणि कार्यक्रमांसाठी आता पुरेसा आर्थिक निधी जमा झाला असून, त्यामुळे पुण्यात मध्यवर्ती पेठांसह कोथरूड, जंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, कर्वेनगर, वारजे, बाणेर, बावधन, औंध, खडकी आदी ठिकाणी असलेल्या विविध धार्मिक स्थळांमध्ये महोत्सव आणि इतर धार्मिक उपक्रमांची संख्या वाढली आहे. महिन्याला किमान 4 ते 5 धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, आता तर धार्मिक संस्थांनी ऑनलाइन पद्धतीने देणग्या स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले की, गणपती मंदिराला देश-विदेशातून भेट देणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. रोज 30 ते 35 हजार लोक भेट देत आहेत. त्यामुळे निश्चितच अर्थचक्रही पूर्णपणे वाढले आहे. धार्मिक स्थळांना भेट देणार्‍यांची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणात धार्मिक संस्थांना देणगी प्राप्त होत आहे. त्यातून महिन्याला एक विशिष्ट रक्कम जमा होत असून, आता ती रक्कम सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी वापरली जात आहे. वर्षभराचे आर्थिक निधीचे नियोजन झाले असून, त्याप्रमाणे खर्च केला जात आहे.

गुरुद्वारामध्येही हजारो लोक भेट देत आहेत आणि देणगी देत आहेत. त्यामुळे आर्थिक चक्र रुळावर आले आहे. दर वर्षी आर्थिक निधीची रक्कम वेगवेगळी असते. ती किती असते, ते सांगता येणार नाही. पण, नियोजन केल्यानंतर त्याप्रमाणे आम्हीही खर्च करीत आहोत.

                                                  – चरणजितसिंग सहाणी,
                                    अध्यक्ष, गुरुद्वारा गुरू नानक दरबार, कॅम्प

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news