Pune News: पुणे विमानतळावरून प्रवास करणार्या ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आता नवीन टर्मिनलवर उतरल्यावर एरोमॉलपर्यंत पायपीट करावी लागणार नाही. कारण, त्यांच्यासाठी आता नवीन टर्मिनलच्या बाहेर पडण्याच्या गेटवरच टॅक्सी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता प्रशासनाने येथे ‘मे आय हेल्प डेस्क’ उभारला आहे.
विमानतळ टर्मिनल परिसरात टॅक्सींमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विमानतळ प्रशासनाने टॅक्सी आणि रिक्षाथांबे यांची एरोमॉल पार्किंगमध्ये तिसर्या मजल्यावर व्यवस्था केली. त्यामुळे सुरुवातीला प्रवाशांना विमानातून उतरल्यावर सामानाच्या बॅगा घेऊन मोठी पायपीट करावी लागत होती. त्याविषयी प्रवाशांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली होती.
मात्र, कालांतराने प्रशासनाने प्रवाशांना एरोमॉलपर्यंत जाण्यासाठी नवीन टर्मिनलसमोरच बॅटरीवरील गाड्या आणि इलेक्ट्रिक बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रवासी बस आणि बॅटरीवरील गाड्यांमार्फत एरोमॉलपर्यंत जातात आणि तेथून टॅक्सीने निश्चित स्थळी जातात. परंतु, या ई-बस आणि बॅटरी गाड्यांची सुविधा असली तरी देखील ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांची येथून जाताना मोठी कसरत होत होती.
त्याची दखल आता विमानतळ प्रशासनाने घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाने येथे आता फक्त ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी ‘मे आय हेल्प डेस्क’ सुरू केला आहे. नवीन टर्मिनलसमोरच हा डेस्क असून, या डेस्कमार्फत फक्त ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिला विमान प्रवाशांसाठीच नव्या टर्मिनल परिसरात टॅक्सीला प्रवेश मिळत आहे. त्याद्वारे या प्रवाशांना निश्चित स्थळी सुरक्षित प्रवास करता येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
नवीन टर्मिनल परिसरात होणार्या कोंडीमुळे आम्ही टॅक्सीला बंदी केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी टॅक्सीला आतमध्ये येण्यास आम्ही परवानगी देत आहे. याकरिता प्रवाशांनी आम्ही उभारलेल्या ‘मे आय हेल्प डेस्क’वर संपर्क करावा. डेक्सवरून बोलावलेल्या टॅक्सीलाच टर्मिनलसमोरील परिसरात प्रवेश मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी या डेस्कशी संपर्क करावा.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ