मुंबई : राज्य सरकारने एस.टी. महामंडळाच्या कर्मचार्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला असून, कर्मचार्यांना दिवाळीआधीच त्यांचा पगार मिळणार आहे.
एस.टी. कर्मचार्यांना पगार देण्यासाठी लागणारी रक्कम राज्य सरकारने महामंडळाकडे वर्ग केली आहे. कर्मचार्यांच्या पगारासाठी 350 कोटी रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे. सणासुदीच्या गर्दीच्या हंगामात प्रवासीसंख्या वाढत असल्याने महामंडळाला चांगला महसूलही मिळतो. सणासुदीला सेवा देणार्या एस.टी. कर्मचार्यांची दिवाळी गोड करण्यासाठी महामंडळाने आधीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. एरव्ही एस.टी. कर्मचार्यांचा पगार दर महिन्याच्या सात ते दहा तारखेदरम्यान त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो. यंदा दिवाळी लवकर आल्यामुळे एस.टी. कर्मचार्यांना सण साजरा करण्यासाठी शासनाने दिवाळीपूर्वीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आम्हाला बोनसही मिळावा, अशी मागणी एस.टी. कर्मचार्यांनी केली आहे. त्यावर अजून निर्णय झालेला नसला, तरी त्यांना त्यांचा पगार दिवाळीपूर्वी मिळणार आहे.